सर्व आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्करचे लसीकरण 16 मार्चपर्यंत पुर्ण करावे–जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

औरंगाबाद दि, 12 (जिमाका) :- सर्व खासगी दवाखाने व त्यांचे कर्मचारी त्याचप्रमाणे सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य कर्मचारी, सर्व फ्रंटलाईन वर्कर या सर्वांचे लसीकरण 16 मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित लसीकरण मोहीमेच्या आढावा बैठकीत श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. विजय वाघ, मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस. शेळके, घाटीचे डॉ. चौधरी यांच्यासह इतर संबंधित उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी यांनी आरोग्य क्षेत्र, फ्रंटलाईन वर्कर या सर्वांचे लसीकरण 16 मार्च पर्यंत पुर्ण करण्याचे निर्देशित करून  जे खासगी दवाखाने आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करुन घेणार नाही त्या दवाखान्यांच्या बाहेर तसा फलक लावला जाईल, असे श्री.चव्हाण यांनी संबधितांना सूचित केले. तसेच नगरपालिका मुख्याधिकारी यांना त्यांच्या अखत्यारीतील सर्वांचे लसीकरण सोळा मार्चपर्यंत पुर्ण करण्याचे आदेशित केले. त्याचप्रमाणे जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिक आणि 45 वर्षापूढील सहव्याधी असणारे यांच्या लसीकरणाला सुरुवात झाली असून त्यांचेही लसीकरण 100 टक्के पुर्ण करण्यासाठीच्या सूचना दिल्या.

तसेच श्री.चव्हाण यांनी जिल्ह्यात लसीकरण मोहिम शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांना व्यापक जनजागृती करुन जनतेला लसीकरणाचे लाभ आणि सुरक्षेबाबत माहिती दयावी,असे सूचित करुन ग्रामीण भागात पोलीस पाटील, सरपंच, तलाठी, ग्रामसेवक यांच्यासोबत आशासेविका, शिक्षक यांनी देखील लसीकरणासाठी नागरिकांना मार्गदर्शन आणि प्रोत्साहान दयावे. तसेच खाजगी डॉक्टरांनी सहव्याधी असणाऱ्या रुग्णांना लसीकरणासाठी प्रमाण पत्र  योग्य दर आकारावेत त्याच प्रमाणे ज्यांना सहव्याधीचे उपचार सुरु आहे त्यांनी आपल्या उपचाराची फाईल लसीकरण केंद्रावर दाखवली तरी त्यांना लस घेता येणार आहे तरी जास्तीत जास्त संख्येने लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिक, सहव्याधी असणारे 45 वरील नागरीक पुढे येतील यासाठी जनजागृती करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी संबंधिताना दिल्या.

त्याचप्रमाणे रुग्णसंख्येला नियंत्रणात आणण्यासाठी संपर्कातील व्यक्तींचा शोध, तपासणी, सर्वेक्षण आणि लसीकरण जनजागृतीसाठी पथकांची नियुक्ती करून त्यांना प्रशिक्षण द्यावे, जेणेकरुन याव्दारे केंद्रीय पथकाने दिलेल्या निर्देशानूसार बाधित क्षेत्रातील आणि इतर भागातील रुग्ण सर्वेक्षणातून वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना तातडीने वाढविता येतील. त्याचप्रमाणे सीसीसी, आरोग्य केंद्र , घाटी याठिकाणी रुग्ण दाखल करण्यासाठीची नियमावली तयार करण्याचे निर्देशित करुन जिल्हाधिकारी यांनी लक्षणे नसलेले, ऑक्सीजन पातळी चांगले असलेले आणि गंभीर रूग्ण यापध्दतीने वेगवेगळया रुग्णासाठीच उपचार पध्दीती, दाखल करून घेण्याची नियमावली तयार करण्याचे सूचित केले.