औरंगाबाद मेट्रोला विरोध करणाऱ्यांना डॉ. कराड यांनी फटकारले

शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपचं शक्तीप्रदर्शन

Image

औरंगाबाद,२ मार्च / प्रतिनिधी :-शहरात जागा नाही, पण ट्रॅफिक वाढणार आहे, लोकसंख्या वाढणार आहे. त्यामुळे इथे मेट्रो कशी करता येईल, याचे प्रयत्न सुरु आहेत. पण काही लोक राजकीय विरोध म्हणून त्याला विरोध करतायत. आत्ता जर मागणी केली तर त्याला पुढचे पाच वर्ष, दहा वर्षे कितीही लागतील, असं वक्तव्य केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केलं.

Image

मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर बुधवारी आयोजित कार्यक्रमात सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन प्रकल्पाच्या (सीजीडी) कामाचे भूमीपुजन केंद्रीय मंत्री दानवे व केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. तर केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू, शहर विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ऑनलाइन उपस्थित राहत कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार हरिभाऊ बागडे, अतुल सावे, प्रशांत बंब, शहराध्यक्ष संजय केणेकर, अनिल मकरिये, राजु शिंदे, समीर राजुरकर, जालिंदर शेंडगे, जिल्हाध्यक्ष विजय औताडे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय, पोलिस आयुक्त निखिल गुप्ता, पोलिस अधिक्षक निमित गोयल उपस्थित होते.

औरंगाबाद शहरातील तब्बल दोन लाख कुटुंबांना पाइपलाइनद्वारे गॅस पुरवठा करण्याच्या योजनेचे आज औरंगाबाद मध्ये उद्घाटन करण्यात आलं. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन करण्यात आलं. औरंगाबाद शहरात तब्बल 60 किलोमीटर अंतरापर्यंत ही गॅस पाईपलाईन असेल. येत्या सहा महिन्यात औरंगाबाद शहरातल्या पहिल्या ग्राहकाला गॅस लाईन द्वारे गॅस पुरवठा केला जाणार आहे तर येत्या दोन वर्षात तब्बल दोन लाख नागरिकांना पाइपलाइनद्वारे गॅस पुरवठा केला जाणार आहे, असं आश्वासन भाजपच्या वतीने देण्यात आलं आहे. या योजनेचे आज औरंगाबाद शहरातील सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर उद्घाटन करण्यात आले. यावेळी तब्बल 10 हजार नागरिकांनी गर्दी केली होती, मात्र औरंगाबाद शहरातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली होती.

Image

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड यांनी खासदार झालो तेव्हापासून या गॅस प्रकल्पासाठी पाठपुरावा सुरु असल्याचे सांगत सूमारे सात लाख नागरिकांना घरगुती कनेक्शन ४ हजार व्यावसायिक तर १ हजार उद्योगांना गॅस पुरवठा केला जाणार असून डिसेंबर २०२२ मध्ये पहिल्या ग्राहकाला गॅस कनेक्शन मिळेल, एलपीजी पेक्षा ३० टक्क्यांनी स्वस्त गॅस मिळेल असे नमूद केले. उद्योग क्षेत्राला अधिक चालना देणारा हा प्रकल्प ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त करतानाच राज्यातील सत्ताधारी ५५ किलोमीटरहून शहराला लवकर पाणी आणू शकत नाही, असा टोला मारला.

Image

जॅकवेलच्या कामासाठी अद्याप परवानगी घेतली नाही. राष्ट्रीय महामार्गालगत पाईप टाकण्याच्या कामासाठी आवश्यक ते शुल्क राज्य शासनाने अद्याप भरले नाही, असा आरोपही त्यांनी करत  केंद्र सरकार औरंगाबादेतील विविध पर्यटनस्थळांचा विकास करणार असे नमूद केले.

Image

शहरात वेगवेगळ्या माध्यमातून विविध क्षेत्रात काम सुरु आहे. शहरात 700 सीसीटीव्ही कॅमेरे लागले आहेत. मिटमिट्यात सफारी पार्कचं काम सुरु आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, शहरात आणखी चार ब्रिजची आवश्यकता आहे, असा प्रस्ताव आम्ही केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर ठेवला. तेव्हा त्यांनी चारऐवजी एकच अखंड पूलाची योजना आमच्यासमोर सांगितली. आम्ही त्यांचं स्वागतच केलं. त्यामुळे आता शेंद्रा ते वाळूज या दोन एमआयडीसींना जोडणाऱ्या अखंड पूलाचा डीपीआर करणं सुरू आहे.  पुढचे 25 वर्षे अमृतकाळ असा उद्देश ठेवून देशाचं बजेट तयार झालं आहे. तेच लक्ष्य समोर ठेवून आम्ही शहरात मेट्रोची मागणी केली. शहरात जागा नाही, पण ट्रॅफिक वाढणार आहे, लोकसंख्या वाढणार आहे. त्यामुळे इथे मेट्रो कशी करता येईल, याचे प्रयत्न सुरु आहेत. पण काही लोक राजकीय विरोध म्हणून त्याला विरोध करतायत. आत्ता जर मागणी केली तर त्याला पुढचे पाच वर्ष, दहा वर्षे कितीही लागतील. मला माहिती नाही. पण किमान तो विचार आणून ते काम करण्याची गरज आहे. म्हणून औरंगाबादेत रस्ते, नॅशनल हायवेसाठी मी प्रयत्न करतोय, असं वक्तव्य डॉ. भागवत कराड यांनी केलं.

Image

औरंगाबादमधील पर्यटन वाढवण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न करणार असल्याचं वक्तव्य डॉ. भागवत कराड यांनी केलं. ते म्हणाले,  वेरुळ आणि अजिंठ्यामुळे औरंगाबादला पर्यटन राजधानीचा दर्जा आहे. जिल्ह्यात शहरात वेरूळ, अजिंठा, बीबी का मकबरा, सोनेरी महल, दौलताबाद, घृष्णेश्वर मंदिर, अहिल्यादेवी कुंड, शहाजीराजाची गढी आहे. या सहा ठिकाणी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मी प्रयत्न करतोय. येत्या सहा महिन्यात प्रत्येक ठिकाणाचं भूमीपूजन करु असे आश्वासन डॉ,कराड यांनी दिले. 

Image

आमदार बागडे यांनी वीस वर्ष खासदार राहूनही एकही योजना आणली नाही. आणलेली समांतर पाणी पुरवठा योजना खासदारांनी पाठीवरुन उतरुच दिली नाही, असा टोलाही त्यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे नाव न घेता मारला. पंतप्रधान आवास योजनेच्या काम शहरात संथ सुरु आहे. फडणवीस सरकारच्या काळात जेवढी घरे झाली त्यापैकी आता पाच टक्केही घरकुल का झाले नाही ? अधिकाऱ्यांना दोष देत नाही कदाचित त्यांना वरुन हळूहळू चला असे सांगितले असेल, असा आरोपही बागडे यांनी राज्यातील आघाडी सरकारला लागवला.

Image

आमदार सावे यांनी शहराच्या विकासाला चालना देणारा हा प्रकल्प असल्याचे नमूद केले. याप्रसंगी बीपीसीएल कंपनीचे कार्यकारी संचालक पी. एस. रवी, कार्यकारी संचालक सुखमल जैन, यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

शहरात होऊ घातलेल्या आणि सद्या प्रगतीपथावर असलेल्या औरंगाबाद शहरासाठी घोषणा करण्यात आलेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरु आहे. या योजनेचे श्रेय शिवसेना घेत असून, आपल्या प्रत्येक कार्यक्रमात याचा उल्लेख शिवसेनेचे नेते न विसरता करतात. दरम्यान, आता भाजपनेही शहरात भूमिगत गॅस योजना आणली असून, त्या योजनेचं श्रेय भाजप नेते घेत आहे. त्यामुळे शिवसेनेची पाण्याची तर भाजपची गॅसची पाईपलाईन अशी चर्चा शहरातील राजकारणात पाहायला मिळत आहे.

भाजपचं शक्तिप्रदर्शन

सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या मैदानावर आज झालेल्या गॅस पाईपलाईनच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी भाजपकडून गेल्या १५ दिवसांपासून तयारी सुरू होती. ४ हजार कोटी खर्च करून शहरात १ हजार ५५५ किमीची पाईपलाईन टाकून, घराघरात गॅस या योजनेच्या माध्यमातून पोहचवला जाणार आहे. त्यामुळे शहरातील सर्वच भाजप नेत्यांकडून हा कार्यक्रम जंगी होण्यासाठी प्रयत्न केला जात होता. एकप्रकारे भाजपला यात यशही आले. कार्यक्रमाच्या ठिकाणी हजारोंच्या संख्येने गर्दी पाहायला मिळाली. या कार्यक्रमस्थळी जिल्हाभरातून लोकं आल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे भाजपच्या या कार्यक्रमाची शहरभर चर्चा होती.