ठाकरे गटाला मोठा धक्का! रवींद्र वायकरांची शिवसेनेला साथ

मुंबई ,१० मार्च / प्रतिनिधी :- लोकसभा निवडणुकांच्या तयारीत सर्व राजकीय पक्ष गुंतलेले असतानाच महाविकास आघाडीला मात्र ऐन निवडणुकांच्या वेळी पक्ष सोडून चाललेल्या आपल्या नेत्यांची चिंता करावी लागत आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची साथ सोडून अनेक नेते महायुतीमध्ये सामील होत आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का पचवावा लागणार आहे. याचं कारण म्हणजे ठाकरे गटाचे आमदार, अत्यंत निष्ठावान नेते आणि उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय रवींद्र वायकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कास कास धरली आहे.हा मोठा मासा शिंदेंच्या गळाला लागल्याने ठाकरे गट आणखी कमकुवत होणार आहे.

सच्चे शिवसैनिक, जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार, मुंबई महानगरपालिकेचे चार वेळा स्थायी समिती सभापती असलेले रवींद्र वायकर यांनी वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याबद्दल आनंद होत असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी व्यक्त केले.

गेल्या अडीच वर्षात राज्यात असलेल्या सरकारने अनेक आमदार, खासदारांची कामे प्रलंबित ठेवल्याने त्यांना काम करणाऱ्या सरकारमध्ये प्रवेश करावा लागला असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या विभागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी जे निर्णय घ्यावे लागतील ते नक्की घेतले जातील असेही यावेळी बोलताना स्पष्ट केले. मुंबई महानगरपालिका, त्यानंतर विधानसभा आणि पक्षाचे काम करण्याचा देखील वायकर यांना प्रदीर्घ अनुभव आहे. या अनुभवाचा शिवसेनेला नक्की उपयोग होईल असे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी सांगितले.

याप्रसंगी शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे, माजी नगरसेवक कमलेश राय, उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे संघटक उदय सावंत तसेच शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातील आणखी एक आमदार शिंदेंच्या गळाला लागल्याची चर्चा होती. या आमदाराने एकनाथ शिंदे यांची गुप्तपणे भेट घेतल्याचीही चर्चा होती. मात्र, हा आमदार नेमका कोण, हे समजू शकले नव्हते. हा आमदार रवींद्र वायकर असल्याची माहिती समोर येत आहे. रवींद्र वायकर आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यात गुप्त बैठक पार पडली. या बैठकीत रवींद्र वायकर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. आम्ही मुळचे शिवसैनिक आहोत, धनुष्यबाणाचे पाईक आहोत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत आम्हाला तुमच्या खांद्याला खांदा लावून लढायचे आहे, असे वायकरांनी एकनाथ शिंदे यांना सांगितल्याचे समजते.

रवींद्र वायकर यांच्यासोबत स्थानिक शिवसैनिकही शिंदे गटात जाण्याची शक्यता आहे. वायकर यांनी सर्व नगरसेवक, शाखा प्रमुख, विभाग प्रमुखांना तयारीत राहण्याचे आदेश दिल्याची माहिती मिळाली आहे.

कोण आहेत रवींद्र वायकर?

जोगेश्वरी भागातून १९९२ मध्ये रवींद्र वायकर पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेवर निवडून आले. २००६-२०१० या काळात वायकर यांनी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले होते. त्यानंतर २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये सलग तीनवेळा जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून वायकर आमदार म्हणून निवडून आले. महाविकास आघाडी सरकारमध्ये रवींद्र वायकर यांच्याकडे गृहनिर्माण आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या राज्यमंत्रीपदाची धुरा होती. त्यानंतर २०१९च्या महाविकास आघाडी सरकारमध्ये वायकर गृहनिर्माण विभागाचे राज्यमंत्री होते.