मविआचे वाद चव्हाट्यावर! काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांचा उद्धव ठाकरेंवर थेट हल्लाबोल

खिचडी घोटाळ्यातील घोटाळेबाजाला दिली उमेदवारी; काँग्रेस नेत्याचा ठाकरेंवर आरोप

मुंबई ,१० मार्च / प्रतिनिधी :- लोकसभा निवडणुकांची तयारी अंतिम टप्प्यात आलेली असताना मविआतील जागावाटपासाठीची धुसफूस आता चव्हाट्यावर येऊ लागली आहे. ठाकरे गटाने मुंबईसाठी जाहीर केलेल्या उमेदवारावर मविआचा भाग असलेल्या काँग्रेसच्या नेत्याने मात्र आक्षेप नोंदवत हल्लाबोल केला आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मविआ टिकणार की नाही, हा एक मोठा प्रश्न आहे.

मुंबईतील उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम संतापले आहेत. त्यांनी अमोल कीर्तीकरांचे घोटाळे बाहेर काढत त्यांना उमेदवारी दिल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

संजय निरुपम म्हणाले की, शिवसेनेने उत्तर पश्चिम मतदारसंघातून उमेदवार जाहीर केला आहे, पण जागावाटपाचा निर्णय अद्याप झालेला नाही. ८ ते ९ जागा प्रलंबित आहेत आणि त्यापैकी एक जागा ही देखील आहे. हे युती धर्माचे उल्लंघन आहे. काँग्रेसची अवहेलना करण्यासाठी जाणीवपूर्वक असे कृत्य केले जात आहे. उद्धव ठाकरे यांनी प्रस्तावित केलेला उमेदवार कोण? तो खिचडी घोटाळ्याचा घोटाळेबाज आहे. त्याने खिचडी पुरवठादाराकडून चेकद्वारे लाच घेतली आहे, असे आरोप संजय निरुपम यांनी केले.

अशा घोटाळेबाज उमेदवाराचा प्रचार करणार का?

संजय निरुपम म्हणाले, कोविडच्या काळात स्थलांतरित मजुरांना बीएमसीकडून मोफत जेवण देण्यात आले. हा चांगला कार्यक्रम होता, पण गरिबांच्या जेवणातूनही शिवसेनेच्या उमेदवाराने कमिशन खाल्ले असून ईडी या प्रकरणाचा तपास करत आहे. अशा घोटाळेबाज उमेदवाराचा प्रचार काँग्रेस आणि शिवसेनेचे कार्यकर्ते करणार का? हा माझा दोन्ही पक्षांच्या नेतृत्वाला प्रश्न आहे.