ही शिवसेना ना उद्धव ठाकरेंची, ना शिंदेंची. ही शिवसेना फक्त बाळासाहेबांच्या विचारांची : एकनाथ शिंदे

मुंबई ,५ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-बीकेसी मैदानावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ही शिवसेना ना उद्धव ठाकरेंची, ना शिंदेंची, ही शिवसेना फक्त बाळासाहेबांच्या विचारांची आणि तमाम शिवसैनिकांची शिवसेना आहे, असे शिंदे यावेळी म्हणाले.

बाळासाहेबांचे खरे वारसदार शिवसैनिक आहेत. वारसा विचारांचा असतो, तो जपायचा असतो. आम्ही त्यांच्या विचारांचा वारसा जपला आहे. आम्हाला बाप चोरणारी टोळी म्हणता, तुम्ही तर बापाचे विचार विकले. एक मर्यादा असते सहन करण्याची. सत्यासाठी तुम्ही हिंदुत्वाला तिलांजली दिली. खरे गद्दार कोण, हे जनतेला समजले आहे. त्यामुळेच जनता आमच्यासोबत आहे. अशी टिका शिंदे यांनी केली आहे.

आम्ही सत्तेसाठी लाचारी पत्कारुन शिवसेना प्रमुखांचा विचार सोडला नाही आणि सोडणार नाही. आम्हाला सत्तेपेक्षा सत्य आणि सत्व महत्वाचे आहे. समोर बसलेला प्रत्येक जण बाळासाहेबांचे निष्टावंत सैनिक आहोत. त्यांचे विचार तुमच्या-आमच्या धमन्यामध्ये आहेत. ते कधीच कोणालाही काढता येणार नाहीत.

मी कुणावर टीका करणार नाही. बाळासाहेबांच्या विचाराशी आम्ही कायम आहोत. आमचे विचार बदलणार नाहीत, बदलले नाहीत. तुम्ही मात्र भरकटलात. सत्तेसाठी लाचार झालात. बाळासाहेबांनी कायम हिंदुत्वाचा पुरस्कार केला. पण हिंदुत्ववादी राजकारण करत चूक केली, असे राज्याच्या सर्वेच्च सभागृत तुम्ही सांगितले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला खूश करण्यासाठी…? बाळासाहेबांची भूमिका चुकीची होती? २५ वर्ष युतीत आम्ही सडलो. हे जाहीरपणे सांगताना तुम्हाला काहीच वाटले नाही का?, अशी घणाघाती टीका एकनाथ शिंदे यांनी केली.

एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही गद्दार नव्हे तर तुम्हीच गद्दार आहात. तुम्ही वैचारिक व्याभिचार केला, विचारांशी पाप केले आहे. त्यासाठी पहिला बाळासाहेबांच्या समाधीवर डोके ठेवा, मग आमच्यावर टीका करा. शिवसेना उभारण्यासाठी आम्ही ४० वर्षे काम केले, आंदोलने केली, लाठ्या-काठ्या खाल्ल्या. आता आम्हाला गद्दार म्हणता? बाळासाहेबांकडे बघून आम्ही गप्प बसलो. अडीच वर्षांपूर्वीच अनेक आमदारांनी सांगितले होते की ही आघाडी योग्य नाही. पण आम्ही सहन केले. पण बाळासाहेबांचे विचार खु्ंटीला टांगल्यानंतर आम्ही गप्प बसणे शक्य नव्हते. आम्ही जे केले ते राज्याच्या भल्यासाठी केले असे एकनाथ शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेदसरा मेळाव्याच्या मंचावर पोहोचताच वर्ल्ड बुक ऑफ लंडनच्या अधिकाऱ्यांनी त्यांचा शाल आणि प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान केला. दरम्यान त्यांच्या नावे असा कोणता विक्रम झाला आहे, असा प्रश्न आता शिवसैनिक आणि सर्वसामान्यांना पडला आहे. 

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात 51 फुटी तलवार ठेवण्यात आली आहे. या तलवारीने हा विश्वविक्रम  केला आहे. त्यामुळे या 51 फुटी तलवारीचे वर्ल्ड बुक ऑफ लंडनमध्ये नोंद करण्यात आली आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांनी मंचावर येत मुख्यमंत्र्यांना प्रशिस्तीपत्रक प्रदान करून त्यांचा सत्कार केला.  

उद्धव ठाकरेंनी विचारलेल्या आनंद दिघेंच्या ‘त्या’ प्रश्नाबाबत शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट  
आनंद दिघेसाहेब गेल्यानंतर मी उद्धव ठाकरेंना भेटलो तेव्हा ते सांत्वन करतील असं वाटलं. दिघे साहेबांनी पक्ष कसा वाढवला?, संघटना कशी वाढवली, आता ठाणे जिल्ह्यात काय करावं लागेल हे विचारतील असं वाटलं होतं. त्यावेळी आनंद दिघेंची प्रॉपर्टी कुठे कुठे आहे, किती आहे आणि कोणाच्या नावावर आहे? असं उद्धव ठाकरेंनी विचारल्याचा गौप्यस्फोट शिंदेंनी केला.

बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो त्यांनी हे विचारल्यावर मला धक्का बसला होता. मी कधी खोटं बोलत नाही, खोटं बोलून सहानूभूती मिळवणारा हा एकनाथ शिंदे नाही, असंही म्हणत शिंदेनी निशाणा साधला आहे. यावर आता उद्धव ठाकरे काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री विराट जनसमुदायासमोर नतमस्तक झाले. मुख्यमंत्री असलो तरी तुमच्यातलाच एक कार्यकर्ता आहे म्हणून मी जनतोसमोर नतमस्तक झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. खरी शिवसेना कुठे आहे याचं उत्तर या जनसागराने दिलं आहे, बाळासाहेबांच्या विचार कुठे आहेत, असा प्रश्ना यापुढे कोण विचार नाही कारण या गर्दीने ते सिद्ध केलं आहे. न्यायालयात जाऊन शिवाजी पार्क मैदान मिळवलं, मी मुख्यमंत्री आहे पण याप्रकरणात हस्तक्षेप करायचा नाही असं मी ठरवलं होतं. 

सदा सरवणकर यांनी पहिला अर्ज दिला होता. पण कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी माझी आहे.  शिवसेनाप्रमुखांची विचार, शिवसेनाप्रमुखांची भूमिका आमच्या सोबत आहे. बाळासाहेबांच्या विचारांना तुम्ही तिलांजली दिली. मग सांगा त्या जागेवर उभं राहून बोलण्याचा नैतिक अधिकार तुम्हाला आहे का, असा सवाल मुख्यमंत्र्यानी विचारला आहे.

हजारो शिवसैनिकांनी आपला घाम, रक्त सांडून जो पक्ष उभा केला. तो तुम्ही तुमच्या वैयक्तित, राजकीय फायद्यासाठी, महत्वाकांक्षेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे गहाण टाकला. बाळासाहेब रिमोट कंट्रोलने सरकार चालवायचे. तुम्ही तर सरकारचा आणि शिवसेनेचा रिमोट कंट्रोल राष्ट्रवादीच्या हातात गहाण टाकला अशी जोरदार टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. त्यांच्या तालावर तुम्ही नाचू लागलात आणि आम्हालाही नाचवू लागलात. बाळासाहेबांनी हरामखोर म्हणून ज्या पक्षांचा उल्लेख केला त्या पक्षांच्या दावणीला तुम्ही शिवसेना बांधली. हे बघून बाळासाहेबांच्या मनालाही वेदना झाली असेल.