एक महिला 15 वर्षे पंतप्रधान होती, पण महिलांचे दुःख दूर केले नाही- रावसाहेब दानवेंची टीका

शिवसेनेचे  माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या श्रेयवादाची उडवली खिल्ली 

औरंगाबाद,२ मार्च / प्रतिनिधी :-पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आले आणि घराघरातील चुलीसमोर बसलेल्या महिलांचं दुःख दूर करण्यासाठी त्यांनी 100 रुपयात गॅस उपलब्ध करून दिला. आज औरंगाबादमध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात घराघरात पाइपलाइनच्या माध्यमातून गॅस उपलब्ध करून देणाऱ्या योजनेचा शुभारंभ होत आहे, असं वक्तव्य केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं.

Image

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वाखाली आज औरंगाबाद शहरात गॅस पाइप लाइनच्या कामाचा शुभारंभ होत असून येत्या काही वर्षात घरोघरी पाइपद्वारे गॅस पोहोचेल, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आळा होता.

शहरातील गॅस पाइपलाइनच्या उद्घाटन कार्यक्रमात रावसाहेब दानवे यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं नाव न घेता अप्रत्यक्ष टीका केली. ते म्हणाले, एक महिला देशात 11 वर्ष पंतप्रधान होती. पण महिलांचं दुःख तिनं समजून घेतलं नाही. फक्त चूल आणि मूल हेच महिलांचं काम आहे, असं त्यांना वाटत होतं. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आले आणि घराघरातील चुलीसमोर बसलेल्या महिलांचं दुःख दूर करण्यासाठी त्यांनी 100 रुपयात गॅस उपलब्ध करून दिला. आज औरंगाबादमध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात घराघरात पाइपलाइनच्या माध्यमातून गॅस उपलब्ध करून देणाऱ्या योजनेचा शुभारंभ होत आहे, असं वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं.

केंद्रीय राज्यमंत्री दानवे म्हणाले की, सुवर्ण महोत्सवी वर्षात गॅसची पाईप लाइन येत असून पीएनजी प्रकल्पामुळे विकास होईल, असे नमूद केले. मनमाड नांदेड रेल्वेमार्गाचे विद्युतीकरणासाठी गेल्या २५ वर्षापासून मागणी करत होतो. या कामाचे उद्घाटन पुढील आठवड्यात जालन्यात होईल,  २०२३पर्यंत काम पुर्ण होईल, असे त्यांनी सांगत रेल्वे दुहेरीकरणासाठी सर्व्हेचे काम सुरु होईल, प्रकल्पासाठी सूमारे एक हजार कोटी खर्च असेल, असेही सांगितले. तर मी नगरसेवक होतो तेव्हा तत्कालीन केंद्रीय पेट्रोलियम मंत्री सुरजितसिंग बर्नाला यांना  पत्र दिले होते, त्यामुळे आज ही पाईप लाइन आली, असे माजी खासदारांनी विधान केले, असे म्हणत दानवे यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे नाव न घेता टोला मारला.