अखेर भाजपच्या रस्ता रोको आंदोलनाला यश, नागमठाण-भगूर- कांटेपिंपळगांव रस्त्याचे काम सुरू

वैजापूर ,३० ऑक्टोबर /प्रतिनिधी :-वैजापूर तालुक्यातील रखडलेले नागमठाण -भगूर – कांटेपिंपळगाव राज्य रस्ता क्र.216 या रस्त्याचे कामास अखेर सुरुवात झाली.

या रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे यासाठी 20 ऑक्टोबर रोजी भाजपतर्फे भगूर फाटा येथे ढोल बडवून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते.सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत असलेला नागमठाण-भगूर-कांटेपिंपळगांव या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली होती.भगूर गावांपासून नागमठाणपर्यंत (14 कि.मी.) डांबरीकरण असून कांटेपिंपळगांव (5 कि.मी.) रस्त्याचे खडीकरण झालेले आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे-मोठे खड्डे पडलेले असून,या भागातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. गेल्या अनेक दिवसापासून रखडलेले या रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्यात यावे या मागणीसाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय औताडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य एकनाथराव जाधव, भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी, तालुकाध्यक्ष कल्याण पाटील दांगोडे यांच्या नेतृत्वाखाली भगूर फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. अखेर भाजपच्या या आंदोलनाला यश येऊन या रस्त्याचे कामास आज शुक्रवारी प्रत्यक्षात सुरुवात झाली. याप्रसंगी भाजप कार्यकर्ते सतीश पाटील शिंदे,अनंत बेळे,सुनील धात्रक,शांताराम दुशिंग,नारायण मुर्तडक,गणेश तांबे,राजू पवार,अशोक टेमकर,सुभाष मोकाटे, ऋषिकेश सातपुते,बबन गायके, ठेकेदार प्रशांत ठोंबरे आदी उपस्थित होते.