अल्पवयीन मुलीशी लग्न केल्यानंतर लैंगिक अत्‍याचार करणाऱ्या तरुणाला अटक

औरंगाबाद,३० जानेवारी / प्रतिनिधी :- अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्‍याशी लग्न केल्यानंतर दररोज लैंगिक अत्‍याचार करणाऱ्या तरुणाला खुलताबाद पोलिसांनी शनिवारी दि.२९ रात्री अटक केली. सचिन मोहन चव्‍हाण (२१, रा. पळसवाडी तांडा. खुलताबाद) असे आरोपीचे नाव असून त्‍याला चार फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश तदर्थ जिल्हा व सत्र न्‍यायाधीश व्‍ही.एम. सुंदाळे यांनी रविवारी दिले.

प्रकरणात १५ वर्षीय पीडितेच्‍या आईने फिर्याद दिली. १७ डिसेंबर २०२१ रोजी पीडितेला अज्ञात व्‍यक्तीने पळवून नेल्याप्रकरणी दिलेल्या तक्रारीवरुन दौलताबाद पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. पोलिसांनी तपास करुन आरोपी सचिन चव्‍हाण आणि पीडितेला माठ (ता. श्रीगोंदा) येथून ताब्यात घेतले. पीडितेचा जबाब घेतला असता, तिने सांगितले की, वर्षभरापूर्वी पीडिता ही आईसह अद्रक काढण्‍यासाठी शेतात जात असताना तिची ओळख अद्रक भरण्‍यासाठी येणाऱ्या सचिनशी झाली. त्‍याने पीडितेच्‍या बहिणीकडे पीडिता ही खूप आवडते,तिच्‍याशी लग्न करायचे असल्याचे सांगितले. ही बाब पीडितेच्‍या बहिणीने पीडितेला सांगितली. पीडितेने देखील त्‍याला होकार दिला. त्‍यानंतर पीडिता ही आरोपीशी तिच्‍या काकाच्‍या मोबाइलवरुन बोलत होती, बोलणे झाल्‍यावर तो क्रमांक डिलीट करुन टाकायची. सचिन हा लेबर सोडण्‍यासाठी जात असताना वेरुळ येथे पीडिता त्‍याला भेटली. घरचे दुसऱ्या मुलासोबत माझ लग्न करणार असल्याचे पीडितेने सचिनला सांगितले. सचिनने आपण पळून जावून लग्न करु असे पीडितेला सांगितले.

१७ डिसेंबर २०२१ रोजी ठरल्याप्रमाणे पीडिता घरुन निघाली. सचिनचा मित्र गणेश याने सचिनला दुचाकीवर पीडितेजवळ आणुन सोडले. त्‍यावेळी सचिन जवळ २५ हजार रुपये होते. ते दोघे लक्झरी बसने बेलबंडी फाट्यावर उतरले. तेथील एका लॉजवर त्‍यांनी दहा-बारा दिवस मुक्काम केला. त्‍यानंतर सचिनच्‍या ओळखीच्‍या नवनाथ मामा (माठ ता. श्रीगोंदा) याला फोन केला. नवनाथ याने दोघांना माठ येथे घेवून गेला. ते त्‍याच्‍या शेतात राहु लागले. त्‍यानंतर दोघे जेजूरीला गेले तेथे त्‍यांनी खंडोबाच्‍या मंदीरात लग्न केले. त्‍यानंतर ते दोघे माठ येथे नबरा-बायको प्रमाणे राहु लागले. लग्नानंतर सचिनने पीडितेवर दररोज लैंगिक अत्‍याचार केला.

आरोपीला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक लोकाभियोक्ता अजित अंकुश यांनी गुन्‍हा गंभीर असून आरोपीने पीडितेवर आणखी कोठे लैंगिक अत्‍याचार केला, गुन्‍ह्यात आरोपीला मदत करणाऱ्या साथीदारांना अटक करायची आहे. गुन्‍हा करण्‍यास आरोपीला कोणी प्रवृत्त केले काय याचा देखील तपास बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.