एमपीएससीच्या ९० हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा डेटा लीक, राज्य लोकसेवा आयोग हॅकर्सच्या रडारवर?

पुणे: एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची माहिती परिक्षेपुर्वीच टेलिग्राम या सोशल मिडिया साईटवर लीक झाल्याने खळबळ उडाली आहे. या लिंकमध्ये ९० हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट लीक झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, यावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं असून या चॅनेलवर प्रसिद्ध झालेली प्रवेशप्रमाणपत्रे वगळता उमेदवारांचा कोणताही अन्य डेटा लीक झालेला नाही. तसेच उमेदवारांचा वैयक्तिक डेटा उपलब्ध असल्याचा तसेच त्यांच्याकडे प्रश्नपत्रिका उपलब्ध असल्याचा करण्यात आलेला दावा खोटा असल्याचे आयोगाने म्हटले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ३० एप्रिल रोजी होणाऱ्या पूर्व परीक्षेच्या हॉल तिकीटची टेलिग्राम लिंक सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे आमच्याकडे सर्व एमपीएससी विद्यार्थ्यांची ऑनलाईन पोर्टल लॉगिन, फी पावती, अपलोड केलेली कागदपत्रे, आधार कार्ड क्रमांक, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल आयडी तसेच पूर्व परीक्षेची प्रश्नपत्रिका २०२३ देखील उपलब्ध आहे, असा दावा देखील या व्हायरल लिंकवर करण्यात आला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने याची दखल घेत ही लिंक कशाप्रकारे जनरेट झाली? कोणी जनरेट केली? या संदर्भात शोध घेण्यास सुरुवात केली आहे. शिवाय या लिंक संदर्भात सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच एमपीएससीची परिक्षा होईल असे आयोगाने म्हटलं आहे.

एमपीएससीच्या सचिव सुवर्णा खरात यांनी सांगितले की, “एका टेलिग्राम चॅनलवर परीक्षेचा डेटा लीक झाल्याची माहिती मिळाली. त्याअनुषंगाने सायबर पोलिसांकडे आम्ही तक्रार दिली असून त्यातील वस्तुस्थिती पडताळणी केली जाणार आहे.” तसेच, ३० एप्रिलला संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे. सायबर पोलिस या प्रकरणावर तपास करणार आहेत. त्यानंतर सत्यता पडताळून पेपर कधी होणार? की ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणार? हे निश्चित केले जाईल.यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागेल.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, ३० एप्रिलला एमपीएससीच्या संयुक्त पूर्व परीक्षा गट ‘ब’, ‘क’च्या परीक्षाचे हॉल तिकीट एका टेलिग्राम चॅनलवर लीक करण्यात आले. यामुळे लाखो विध्यार्थ्यांची माहिती हॅक झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, तब्बल ९० हजारांपेक्षा अधिक विध्यार्थ्यांचे हॉल तिकिट हॅक झाले असून ते एका टेलिग्राम चॅनलवर अपलोड करण्यात आले आहेत. या परीक्षेचा पेपरसुद्धा आपल्याकडे असल्याचा दावा त्यामध्ये करण्यात आला. यावरून केलेल्या तक्रारीनंतर आता पोलीस तपास करत आहेत.