लोकशाहीवरचा विश्वास अधिक दृढ करा – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त उपस्थितांनी घेतली शपथ

औरंगाबाद, दिनांक 25 : लोकशाहीवरचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज केले.

एमजीएम परिसरातील रूख्म‍िणी सभागृहात आयोजित राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी पोलिस आयुक्त निखिल गुप्ता, ले.कर्नल व्यंकटेश पी, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, डिस्ट्रिक्ट युथ आयकॉन नवेली देशमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम आदींची उपस्थिती होती. 

May be an image of 2 people

श्री. चव्हाण म्हणाले, भारतासारख्या लोकशाहीप्रधान देशात लोकशाही रुजविण्यासाठी पूर्वीपासून निवडणूक आयोगाने मोठ्याप्रमाणात परिश्रम घेतले आहेत. अनेक संशोधनातून देशातील निवडणूक प्रकिया बदलत गेली. पूर्वी मतदार मतपत्रिकांच्या कागदावर मतदानाचा अधिकार बजावत. आता बॅलट मशीनवर मतदार मतदान करत आहेत. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर आणि बदलांचा स्वीकार निवडणूक आयोग करत असते. नवतंत्रज्ञानाची कास धरून निवडणूक आयोग पारदर्शक पद्धतीने निवडणूक प्रकिया पार पाडत असते. सध्या व्हीव्हीपॅट सारखा पर्यायही मतदारांना निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिला आहे. त्यासह विविध तंत्रज्ञानाचा वापर करून दिव्यांग, नोकरदार, तृतीय पंथी आदी प्रकारच्या सर्व घटकांचा विचार करून निवडणूक आयोग मतदारांना मतदान करण्याबाबत सुविधा उपलब्ध करून देत आहे. नवा भारत निर्माण करण्यासाठी देशातील लोकशाही अधिक बळकट होणे आवश्यक असल्याने नवमतदारांनी मतदानाचा हक्क बजावायलाच हवा, असे आवाहनही श्री. चव्हाण यांनी केले.

श्री. गुप्ता म्हणाले, भारतीय संविधानाने सर्वांना समान असा मतदानाचा हक्क बजावण्याचा अधिकार दिला आहे. सर्वांनी मतदान करण्यासाठी आग्रही असावे, त्यातूनच देशात बळकट लोकशाही निर्माण होईल. लोकशाहीत प्रत्येक मताचे मुल्य अमुल्य असे आहे. त्यामुळे प्रत्येक 18 वर्षांवरील मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून राष्ट्रनिर्माणात हातभार लावण्यास पुढाकार घ्यावा, असे आवाहनही श्री. गुप्ता यांनी केले.

श्री. व्यंकटेश म्हणाले, मतदान करणे प्रत्येक मतदारांचा अधिकार आहे. पण तो बजावयालाच हवा, त्यातूनच बळकट लोकशाही होण्यास मदत होईल.

देशमुख यांनीही मतदानाचे महत्त्व सांगताना निवडणूक आयोगाने मतदारांसाठी विविध तंत्रज्ञानाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. ज्यामध्ये मतदान केंद्रातील बदल,नावातील बदल आदी प्रकार आपण सहजरित्या आता करू शकतो. लोकशाहीला बळकट करण्याचे कार्य प्रत्येक नागरिकाचे मत करू शकते. म्हणून प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावतानाच आपली राष्ट्रीय जबाबदारी म्हणून मतदान करावे, त्यातूनच आपली लोकशाही अधिक बळकट होण्यासाठी हातभार लागेल, असेही कु. देशमुख यांनी सांगितले. राष्ट्रीय मतदार दिवसाच्या प्रतिज्ञाचे वाचन करत उपस्थितांना शपथ कु. देशमुख यांनी यावेळी दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.गव्हाणे यांनी केले. यामध्ये त्यांनी निवडणूक आयोगाची कामगिरी याबाबत सविस्तर माहिती देऊन राष्ट्रीय मतदार दिवसाचे महत्तव विषद केले. तसेच सर्वांना मतदान करण्याबाबत सर्वांनी जागृती निर्माण करायला हवी, असेही मत व्यक्त केले.

मान्यवरांच्याहस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. त्यानंतर भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांचा व्हिडिओद्वारे संदेश उपस्थितांना दाखविण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर आणि कोमल औताडे यांनी केले,आभार उपजिल्हाधिकारी डॉ. कदम यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

Displaying _DSC8996.JPG

नव मतदारांना ओळखपत्राचे वितरण

नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या नव मतदारांना निवडणूक ओळखपत्र मान्यवरांच्याहस्ते वितरित करण्यात आले. यामध्ये आदित्य नाईक,रोहित खोतकर, सचिन केदारे, अजहर अफसर पठाण, सौरभ खंडागळे, मुस्तफा हुसेन सय्यद, चैतन्य लोखंडे, केतकी लोखंडे, योगेश कदम, स्वरदा जोशी, जान्हवी जैन, सौरभ काळे, विनय जोजारे, सागर जाधव, मो. रोहन चिश्ती, मो. फरहान चिश्ती आदी नवमतदारांचा समावेश होता.

Displaying _DSC9003.JPG

स्पर्धकांना बक्षीस वितरण आणि अधिकाऱ्यांचा गौरव

Displaying _DSC9058.JPG

राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त आयोजित विविध स्पर्धेतील स्पर्धकांना कार्यक्रमात मान्यवरांच्याहस्ते प्रशस्ती पत्र, रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. यामध्ये निबंध, पोस्ट, चित्रकला, शॉर्ट फिल्म या प्रकारच्या स्पर्धांचा समावेश होता. तसेच मतदान प्रक्रियेदरम्यान व मतदारांमध्ये जागृती करण्यासंदर्भात केलेल्या कार्याची दखल घेत प्रशासनाकडून संगणक परिचालक, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी,पर्यवेक्षक यांना प्रशस्ती पत्र देऊन गौरविण्यात आले.

Displaying _DSC8986.JPG

औरंगाबाद शहरातील मतदार संघातील स्पर्धेच्या स्पर्धकांनाही बक्षीसांचे वितरण मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले. तसेच मतदार नोंदणी व मतदार यादी शुद्धीकरणाबाबत उपजिल्हाधिकारी संगीता सानप, मतदार जागृतीबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरिष बनसोडे आणि निवडणूक मतदार नोंदणी व मतदार जागृतीबाबत विविध विषयांवर व्हिडिओ तयार करून त्याचे सादरीकरण केल्याबाबत मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधिनीच्या संचालक तथा  उपजिल्हाधिकारी श्रीमती धानोरकर यांच्याही कार्याचा गौरव प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्याहस्ते करण्यात आला.