औरंगाबाद मनपाच्‍या औषध भांडारातून ४८ रेमडेसिवीर इंजेक्शनची चोरी ,विष्णू रगडे व प्रणाली कोल्हे यांच्या कोठडीत वाढ   

एमपीएसचे ७५ इंजेक्शन कोठून आणले याचा देखील तपास बाकी

औरंगाबाद,१० मे /प्रतिनिधी :

मनपाच्‍या औषध भंडारातून ४८ रेमडेसिवीर इंजेक्शनची चोरी केल्याप्रकरणात आरोपी मनपाचा औषध निर्माण अधिकारी तथा भंडार प्रमुख विष्‍णु दगडुजी रगडे (५४, रा. मारोतीनगर, मयुर पार्क हर्सुल) आणि सहायक औषध निर्माण अधिकारी प्रणाली शेषराव कोल्‍हे (ज्‍योत्सना हा.सो मयुर पार्क) या दोघांच्‍या पोलीस कोठडीत बुधवारपर्यंत दि.१२ वाढ करण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी एस.यू. न्‍याहारकर यांनी सोमवारी दि.१० दिले. आरोपींना ३ मे रोजी पोलिसांनी अटक केली आहे.

Remdesivir injection explained: 8 basic things to know about the  high-demand COVID-19 drug- The New Indian Express

या प्रकरणात मनपाचे वैद्यकिय अधिकारी तथा औषधी भंडार नियंत्रक बाळकृष्‍ण दत्तात्रय राठोडकर (५२, रा. दिशा श्रीपुरम, बीड बायपास रोड) यांनी फिर्याद दिली. त्‍यानूसार  दोघा आरोपीं विरोधात जिन्‍सी पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

पोलिस  कोठडीदरम्यान आरोपी प्रणाली कोल्हे हिने पोलिसांना माहिती दिली की, ९ एप्रिल रोजी औषधी भंडारमधील रेमडेसिवीरचा साठा तपासला असता त्‍यात एक बॉक्स कमी असल्याचे समोर आले. ही बाब प्रणालीने आरोपी रगडेला सांगितली. ११ एप्रिल रोजी रगडेने प्रणाली हिला फोन करुन मेल्ट्रॉन रुग्णालय येथे बोलावले. तेथे रगडेने मेल्ट्रॉनचे फार्मसिस्‍ट कापुरे यांना रेमडेसिवीरचा एक बॉक्‍स अॅड्जस्ट  करण्‍याचे सांगितले, मात्र कापुरे यांनी नकार दिला. त्‍यानंतर रगडेने रेमडेसिवीरचा रिकामा बॉक्‍स घेतला व तो प्रणालीला देत घरी घेवून जाण्‍यास सांगितले. त्‍यानूसार प्रणाली तो बॉक्‍स घेवून घरी गेली. दुसऱ्या  दिवशी सकाळी रगडेने तो बॉक्‍स प्रणाली कडून घेतला व भवानीनगरातील मनपाच्‍या मुख्‍य औषधी भांडारात जावून रिकाम्या बॉक्समध्‍ये एमपीएस चे ७५ इंजेक्शन भरुन लेबलींग केली. प्रणाली ही कार्यालयात गेल्यावर रगडेने ही बाब प्रणाली सांगीतली. व कोणाला काही सांगु नका, काही दिवसात रेमडेसिवीरचे इंजेक्शन अॅडजस्‍ट करतो असे सांगितली. याबाबत पोलिसांनी आरोपी रगडेकडे चौकशी केली असता त्‍याने उडवा उडवीची उत्‍तरे दिली.

आरोपींच्‍या कोठडीची मुदत संपल्याने त्‍यांना आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील समिर बेदरे यांनी आरोपी रगडे याने बॉक्‍समधून घेतलेले ४८ इंजेक्शन कोणला विक्री केले याचा तपासा करुन ते जप्‍त करणे आहे. आरोपीचे आणखी कोणी साथीदार आहे काय याचा तपासा करणे आहे. तसेच आरोपीने रेमडेसिवरी ऐवजी एमपीएसचे ७५ इंजेक्शन कोठून आणले याचा देखील तपास बाकी असल्याने आरोपींच्‍या कोठडीत वाढ करण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.