समरसता ही जीवनशैली बनावी – कुलगूरू डॉ. दिलीप ऊके यांचे प्रतिपादन

छत्रपती संभाजीनगर ,२४  एप्रिल / प्रतिनिधी :-बाबासाहेबांचे व्यक्तिमत्त्व हे बहुआयामी होते. भारतीय संविधान निर्मिती प्रक्रियेत त्यांचे योगदान अतुलनीय आहे. समरसता हा एका दिवसापुरता साजरा करावयाचा सोहळा न राहता समरसतेस  दैनंदिन जीवनशैलीचा भाग बनवणे हा बाबासाहेबांचा खरा सन्मान ठरेल असे प्रतिपादन महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ मुंबईचे कुलगूरू डॉ दिलीप ऊके यांनी केले. 

उच्च न्यायालय वकीलसंघ – खंडपीठ औरंगाबाद तसेच अधिवक्ता परिषद देवगिरी प्रांत यांच्या सयुंक्त विद्यमाने समरसता दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.  प्रमुख पाहुणे म्हणून न्या. नितीन सांबरे उपस्थित होते.

भारतीय संविधानातील लोकशाही संकल्पनेत आपल्याला बौद्ध तत्वज्ञानाचे प्रतिबिंब दिसते. बाबासाहेब केवळ एक यशस्वी वकील, विधीज्ञ नव्हते तर एक निष्णात अर्थतज्ज्ञ, परखड पत्रकार, व्यासंगी संशोधक, व उत्कृष्ट कायदेमंत्री होते. संविधानातील अनेक संकल्पनांविषयी त्यांनी केलेली मांडणी त्यांची दूरदॄष्टी दर्शवते. संविधानात सांगितलेल्या आर्थिक आणि राजकीय न्यायाचे रूपांतर सामाजिक न्यायात झाल्याखेरीज बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत साकारणार नाही, असेही डॉ ऊके म्हणाले. 

टीकेसही सकारात्मकपणे कसे सामोरे जावे याचा वस्तूपाठ बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वातून घेण्यासारखा आहे. संविधान सभेतील आपल्या टीकाकार सहकार्‍यांप्रती बाबासाहेबांनी कधीही अप्रिती बाळगली नाही. मतभिन्नतेचा आदर कसा ठेवावा हे बाबासाहेबांच्या कार्यातून शिकण्यासारखे आहे. बाबासाहेबांची दूरदृष्टी आणि समाजाप्रतीची त्यांची तळमळ प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन न्या नितीन सांबरे यांनी केले.

उच्च न्यायालय वकील संघाचे अध्यक्ष ॲड नितीन चौधरी यांनी प्रास्ताविक केले तर सचिव ॲड सुहास उरगुंडे यांनी आभार मानले. ॲड नेहा कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. ॲड स्वप्नील जोशी यांनी अधिवक्ता परिषदेच्यावतीने मान्यवरांचे स्वागत केले.