वैजापूर तालुक्यातील विविध प्रकल्पातील पाणीसाठा 35 टक्क्यांच्या खाली ; मान्सूनकडे सर्वांचे लक्ष

वैजापूर ,५ जून  /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील सर्व छोट्या – मोठया प्रकल्पातील पाणीसाठा 35 टक्क्यांच्या खाली आलेला असून पूर्व मोसमी पावसाने तालुक्यात अद्यापही हजेरी लावली नसल्याने शेतकऱ्यांसह सर्वांची चिंता वाढली आहे. आता मान्सूनच्या पावसाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मागील वर्षी चांगल्या पाऊस झाल्यामुळे तालुक्यातील सर्व छोटे- मोठे पाणी प्रकल्प शंभर टक्के भरले होते.धरणे ओव्हरफ्लो झाल्याने त्यातून पाणी नदीपात्रात सोडावे लागले होते. परिणामी वर्षभर शेती सिंचनासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी धरणांमध्ये मुबलक पाणी साठा उपलब्ध झालेला होता. यावर्षी कडक उन्हाळयामुळे पाण्याचे बाष्पीभवन मोठ्याप्रमाणात होऊन धरणातील पाणीसाठा कमी झाला.

2 जून अखेर तालुक्यातील विविध धरणांतील पाणीसाठा 35 टक्क्यांच्या खाली आलेला आहे.तालुक्यातील नारंगी मध्यम प्रकल्पात (30.26 टक्के), बोर-दहेगांव मध्यम प्रकल्पात (33.74 टक्के), कोल्ही मध्यम प्रकल्पात (30.63 टक्के), बिलवणी लघुतलाव (7.54 टक्के), सटाणा लघुतलाव (38.19 टक्के), गाढेपिंपळगांव लघुतलाव (10.31टक्के), मन्याड साठवण तलाव (40.66 टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे. तर खंडाळा लघु तलाव व जरुळ लघु तलाव या दोन्ही तलावातील पाण्याची पातळी जोत्याच्या खाली आहे.
तालुक्यातील पाच प्रमुख धरणांमध्ये 30 टक्क्यांच्या वर उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून मागील वर्षीप्रमाणेच या वर्षीही धरणे भरावी म्हणून चांगल्या पावसाच्या अपेक्षा आहेत. यावर्षीही धरणे पूर्ण क्षमतेने भरतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.