वैजापूरचे शिंदे गटाचे आमदार बोरणारे यांना महिलेने सुपारी देऊन जीवे मारण्याची धमकी दिल्याचे पत्र

अज्ञात व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल 

वैजापूर ,१४ एप्रिल  / प्रतिनिधी :- वैजापूरचे शिंदे गटाचे आमदार रमेश पाटील बोरणारे यांना जीवे मारण्याची धमकी टपालाद्वारे मिळाल्याने खळबळ उडाली आहे. आमदार रमेश बोरणारे यांचे संपर्क कार्यालय शहरातील मुरारी पार्क भागात असून या कार्यालयात टपालाने हे पत्र प्राप्त झाले. पत्रात आमदार रमेश बोरणारे यांना एका महिलेने सुपारी देऊन जीवे मारण्याची धमकी दिल्याचे नमूद केले आहे. या पत्राची गांभीर्याने दखल घेत आमदार बोरणारे यांनी वैजापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

आमदार बोरणारे हे शिंदे गटात गेल्यापासून नेहमीच चर्चेत राहिले आहेत. याशिवाय त्यांनी शिंदे गटात गेल्यापासून विकास कामांचा धडाका आणखी वाढवला आहे. त्यामुळे ते आणखीच चर्चेत आले आहेत. अशा परिस्थितीत त्यांना कुणीतरी टपालाने पत्र पाठवुन जीवे मारण्याची धमकी दिल्याने सर्वत्र चर्चा असून एकच खळबळ उडाली आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.