वैजापूर तालुक्यातील पाच जणांना ‘पीएसआय’ परीक्षेत यश; जयश्री निगळ व अंगणवाडी मदतनीस कोमल झाली पोलिस उपनिरीक्षक

वैजापूर ,​६​ जुलै / प्रतिनिधी :-महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2020 अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदाची तात्पुरती निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल दोन वर्षांपासून रखडला होता. हा निकाल मंगळवारी (ता.04) जाहीर झाला असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. यात वैजापूर तालुका आघाडीवर असून या तालुक्यातील चार ते पाच जणांना पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत यश मिळाले आहे.

वैजापूर तालुक्यातील वाल्मिक मोरे (पिंपळगाव खंडाळा), विशाल सवई (अव्वलगांव), संतोष कदम, कोमल सचिन कुमावत (लोणी खुर्द), जयश्री जनार्दन निगळ (कापूसवाडगांव) यांनी पोलिस उपनिरीक्षक परिषदेत यश संपादन केले आहे. जयश्री जनार्दन निगळ ही कापूसवाडगाव येथील असून तिचे चौथीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रोहमवस्ती कापूसवाडगांव येथे झाले आहे. घरची परिस्थिती बेताची असल्याने पुढील शिक्षण तिने आपल्या मामाकडे पूर्ण केले. मेहनत, जिद्द व कष्टाच्या जोरावर ती आज पोलिस उपनिरीक्षक झाली. 

कोमल सचिन कुमावत

अंगणवाडी मदतनीस झाली पीएसआय

तालुक्यातील लोणी खुर्द येथील अंगणवाडी मदतनीस कोमल सचिन कुमावत हिने आपल्या संसाराचा गाडा संभाळत पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत यश संपादन केले आहे. कोमल यांचे आठ वर्षांपूर्वी लग्न झालेले असून त्यांना एक मुलगाही आहे. पती व सासू-सासरे यांचे सहकार्य व मार्गदर्शन मिळाल्याने ही परीक्षा मी यशस्वीपणे उत्तीर्ण केल्याचे कोमल हिने सांगितले. लोणी खुर्द हे माहेर आणि सासरचे गांव एकच असल्याने नातेवाईकांचेही चांगले सहकार्य मिळाल्याचेही कोमल हिने सांगितले. संसाराचा गाडा हाकत तिने मिळविलेले पीएसआय परीक्षेतील यश निश्चितच कौतुकास्पद आहे.