वैजापूर शहरातील सेंट मोनिका शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

वैजापूर ,​५​ जून/ प्रतिनिधी :-शहरातील प्रथितयश यश सेंट मोनिका विद्यालयात ९०% पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या 23 विद्यार्थ्यांचा संस्थेच्या सचिव व वैजापूर शहराच्या मा.नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी यांच्याहस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. शंभर टक्के निकालाची परंपरा विद्यालयाने यावर्षीही कायम ठेवली.

२०५ विद्यार्थ्यांपैकी १३९ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यश्रेणी प्राप्त केली तर ५२ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी प्राप्त केली. प्रगती दादासाहेब कुंदे हिने ९५.२० % व हिंदी विषयात १०० गुण प्राप्त करत विद्यालयात प्रथम क्रमांक प्राप्त केला. कृष्णा बाबासाहेब गवारे याने ९४.४० %  गुण प्राप्त करत द्वितीय क्रमांक पटकावला तर श्रुतिका अरविंद भोसले हिने ९४ % गुण प्राप्त करत तृतीय क्रमांक प्राप्त केला. यंदा विद्यालयाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे.

उपस्थित विद्यार्थ्यांचे कौतुक करत संस्थेच्या सचिव शिल्पा परदेशी यांनी विद्यार्थ्यांना यथोचित मार्गदर्शन केले. या कौतुक सोहळ्यास शाळेचे मुख्याध्यापक किशोर साळुंखे, मुख्याध्यापिका स्वाती खैरनार, शिक्षक सोनवणे, आनंद मार्कम्, विजय डांगे, अजय क्षिरसागर, आनंद हिरण, संदीप सूर्यवंशी, प्रांजल कोठारी तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागेश बापट सर यांनी केले.