लाडगाव खून प्रकरणातील आरोपी अल्पवयीन असल्याचे बोगस जन्म प्रमाणपत्र देणाऱ्या उपसरपंचास अटक

वैजापूर,​७​ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील लाडगाव शिवारातील शेतवस्तीवर झालेल्या खूनप्रकरणातील अल्पवयीन मुलाचे बनावट जन्मप्रमाणपत्र देणार्‍या तालुक्यातील गोयगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचास वैजापूर पोलिसांनी मंगळवारी अटक केली. जालिंदर मोटे ( 54 रा. गोयगाव ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे .

तालुक्यातील गोयगाव येथील संजय यमाजी मोटे याने 17 जून 2009 रोजी गोयगाव ग्रामपंचायतीकडून त्याच्या मुलाचे बनावट जन्म प्रमाणपत्र काढले होते. याच मुलाने पुढे बहिणीने प्रेमविवाह केल्याने तिचा खुन केला होता. मात्र बनावट जन्म दाखल्या आधारे तो अल्पवयीन ठरल्याने खून खटल्यास वेगळे वळण मिळाले होते. तालुक्यातील गोयगाव ग्रामपंचायतीच्या तत्कालीन उपसरपंचासह ग्रामसेवकाने कोणतीही शहानिशा न करता 18 जून 2009 रोजी संजय मोटे याच्या मुलाचा जन्म गोयगाव येथील नसताना व त्याची जन्मदिनांक 20 एप्रिल 2003 ही नसतानाही बनावट प्रमाणपत्र दिले होते तसेच त्याच्या जन्माच्या तारखेत खाडाखोड करून शाळेची फसवणूक केली होती.त्यामुळे हेच बनावट जन्मप्रमाणपत्र न्यायालयीन कामकाजात वापरून न्यायालयाची देखील फसवणूक करण्यात आली होती. त्यामुळे उपसरपंच व ग्रामसेवकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे  वैजापूर पोलिसांनी तब्बल वर्षभरानंतर उपसरपंच जालिंदर मोटे यांना 6 सप्टेंबर रोजी अटक केली आहे.