नांदूर-मधमेश्वर बंधाऱ्यातून 79 हजार 848 क्यूसेसने गोदावरीत पाणी विसर्ग ; वैजापूर तालुक्यातील गोदाकाठच्या 17 गावांना सतर्कतेचा इशारा

वैजापूर,१२ जुलै /प्रतिनिधी :- गेल्या चार-पांच दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत असल्याने नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये मोठ्याप्रमाणात पाण्याची आवक सुरू असून पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. दारणा, गंगापूर व मुकणे ही धरणं 60 टक्क्यांवर भरली असून आज सायंकाळी सहा वाजता नांदूर-मधमेश्वर बंधाऱ्यातून 79 हजार 848 क्यूसेस पाणी गोदावरीत सोडण्यात आले आहे. त्यामुळे गोदावरी दुथडी भरून वाहू लागली असून वैजापूर तालुक्यातील गोदकाठच्या 17 गावांना अतिदक्षतेचा इशारा प्रशासनाच्यावतीने देण्यात आला आहे.

प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन

पावसाचे प्रमाण जास्त झाल्याने तसेच गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढल्याने गोदावरी नदीचे पाणी पातळीत वाढ झाली आहे.विरगाव हद्दीतील 17 गावे ही गोदावरी नदी किनारी वसलेली आहेत.या 17 गावांना अहमदनगर जिल्ह्यात जोडण्यासाठी 6 ब्रीज गोदावरी नदीवर बांधलेले आहेत.त्यापैकी 4 ब्रीज हे पाण्याखाली गेलेले आहेत.राहिलेले  2 ब्रीज संध्याकाळ पर्यंत पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.परिसरात पाऊस थांबलेला आहे परंतू नाशिक जिल्ह्यातील नांदूर मध्यमेश्वर धरणातून पाणी विसर्ग सुरू असल्याने पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

वांजरगाव येथील गोदावरी नदीवरील पुलावरून सराला बेट या ठिकाणी भाविक गुरू पौर्णिमाला दर्शनासाठी जात असतात.परंतु पुलावरून पाण्याची पातळी वाढत असल्याने उद्या गर्दी होऊन अडचण निर्माण होऊ शकते त्यासाठी योग्य तो पोलिस बंदोबस्त देण्यात आला आहे तसेच जिल्हा प्रशासनाच्यावतीने बचाव पथकची टीम वांजरगाव येथे मुक्कामी पाठवत आहेत.तरी सर्व भाविक आणि ग्रामस्थ यांना पुराचे परिस्थिती पासून काळजी घेण्याचे आणि पोलिस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. असे विरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांनी सांगितले.