दाट वस्तीत विधवेवर अनेकवेळा बलात्कार झाला हे अविश्वसनीय-औरंगाबाद खंडपीठ

औरंगाबाद खंडपीठाने आरोपीवरील गुन्हा, आरोपपत्र केले रद्द

औरंगाबाद,२ जानेवारी  / प्रतिनिधी :-  दाट निवासी वसाहतीत दोन मुलांची आई असलेल्या विधवेवर अनेकवेळा जबरदस्तीने बलात्कार केला गेला यावर विश्वास ठेवणे कठीण आहे, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने एका व्यक्तीवर दाखल झालेला गुन्हा (एफआयआर) आणि आरोपपत्र फेटाळून लावले. न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि न्यायमूर्ती अभय वाघसे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.

दाखल झालेला गुन्हा आणि आरोपपत्र रद्द करण्यात यावे अशी याचिका आरोपीने उच्च न्यायालयात केली होती. तिने दिलेल्या तक्रारीवरून या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला होता. 18 मार्च, 2017 रोजी महिलेचा पती वारला. महिलेने आरोप केला होता की, ती 13 जुलै, 2017 रोजी तिच्या मुलांसोबत असताना अर्जदार पाणी पिण्याच्या निमित्ताने घरात आला. त्याने चाकू दाखवून ठार मारण्याच्या धमक्या दिल्या. त्याने जबरदस्तीने माझ्याशी संभोग केला, असाही तिने आरोप केला होता. आरोपीने माझ्याकडे पैसेही मागितल्याचा तिने आरोप केला होता. तिने पैसे द्यायला नकार दिल्यावर त्याने तिचे दागिने नेले व ते मी सराफाकडे गहाण ठेवीन, असे म्हणाला. आरोपीने तिच्यावर अनेकवेळा बलात्कार केला व मारहाणही केली, असे दाखल झालेल्या गुन्ह्यात म्हटले होते.

अर्जदाराच्या वकिलाने खंडपीठासमोर युक्तिवाद केला की, एफआयआर हा उशिराने दाखल झालेला, खोटा आणि पूर्णपणे निराधार आरोपांचा आहे. 

विधवा ही दोन मुलांची आई असून ती दाट लोकवस्तीत राहते. आरोपी व पीडिता हे एकमेकांना प्रदीर्घ काळपासून ओळखतात. सराफाने म्हटले की, तिच्या सांगण्यावरूनच दागिने गहाण ठेवले गेले, असेही वकिलाने म्हटले. तिच्या पालकांच्या निवेदनावरून कथित अत्याचारांबद्दल त्यांना काही माहिती नव्हती, असे दिसते. तिने स्वतःही त्यांची कधीही भेट घेतली नाही तसेच त्यांना भेटायलाही येऊ दिले नाही असाही युक्तिवाद त्याने केला..

अतिरिक्त सरकारी वकिलाने युक्तिवादात म्हटले की, चाकूच्या धाकावर महिलेवर अनेकवेळा बलात्कार झाला आणि तिचे दागिने जबरदस्तीने नेण्यात आले. पीडितेने धाडस दाखवून एफआयआर दाखल केला आणि अर्जदाराविरोधात पुरेसे साहित्य आहे, असेही वकिलाने न्यायालयाला सांगितले. या वकिलाचा युक्तिवाद असाही होता की, महिलेवर अनेकवेळा बलात्कार झाला आणि अर्जदाराने तिला व तिच्या मुलांना ठार मारण्याच्या धमक्या दिल्या. तपास पूर्ण झाला असून आरोपपत्रही दाखल झाले आहे त्यामुळे त्याच्यावर खटला चालला पाहिजे.

खंडपीठाने नमूद केले की, एफआयआर हा पीडितेने सहा महिन्यांनी दाखल केला. पुरवणी निवेदनात पीडितेने म्हटले आहे की, अर्जदार हा नियमितपणे तिच्या घरी यायचा. एवढेच काय त्याने तिला मदतही केली आहे. तिने तिचे एटीएम कार्डही विश्वासाने त्याला व्यवहारासाठी दिले होते, असेही निवेदनात दिसते. त्यामुळे त्या दोघांमध्ये तिचा पती असल्यापासून प्रदीर्घ मैत्री होती, असे समजण्यास जागा आहे. सराफाच्या निवेदनातही त्याला अर्जदार आणि पीडिता माहीत असल्याचे व पीडितेनेच तिचे दागिने गहाण ठेवले हे दिसते, असेही खंडपीठाने म्हटले.

न्यायालयाने म्हटले की, पीडितेच्या पालकांनीही पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, आमची मुलगी स्वतंत्र राहात असून तिने ना आमची भेट घेतली ना तिच्या घरी आम्हाला येऊ दिले. त्यामुळे कोणतीही घटना घडल्याची आम्हाला अजिबात माहिती ना्ही.

विधवेवर दाट वस्तीत बलात्कार झाला यावर विश्वास ठेवणे कठीण आहे, असे खंडपीठाने म्हटले. आमचे विचारपूर्वक मत असे आहे की, एफआयआर दाखल करण्यास अमर्याद विलंब झाला याशिवाय अर्जदारावरील बलात्काराचे आरोप विश्वसनीय वाटत नाहीत. वस्तुस्थिती ही आहे की, पीडिता आणि अर्जदार यांचा प्रदीर्घ काळपासून परिचय  होता. दाट लोकवस्तीत राहणाऱ्या दोन मुलांच्या विधवा आईवर जबरदस्तीने अनेकवेळा बलात्कार झाला हे मान्य करणे कठीण आहे, असे न्यायालयाने एफआयआर व आरोपपत्र रद्द करताना म्हटले.

आमचे विचारपूर्वक असे मत आहे की, पीडिता आणि अर्जदार यांच्यात जेव्हाकेव्हा शारीरिक संबंध आले असतील ते बाह्यतः सहमतीने होते, असे वर चर्चा झालेल्या कारणांवरून दिसते. त्यामुळे अर्जदारावर अशा आरोपांवरून खटला चालवल्यास त्याला दुःख देणेच नव्हे तर त्याच्यावर अन्यायही होईल.