छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचा गृहनिर्माण मंत्र्यांनी घेतला आढावा

छत्रपती संभाजीनगर,२१ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- म्हाडाचा विभागीय घटक असलेल्या छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचा आज राज्याचे गृहनिर्माण  मंत्री अतुल सावे यांनी आढावा घेतला.

आज दुपारी मंत्री श्री. सावे यांनी म्हाडाच्या विभागीय कार्यालयास भेट दिली. यावेळी म्हाडाचे मुख्य अधिकारी मंदार वैद्य,  कार्यकारी अभियंता नितीन शिंदे, उपमुख्य अधिकारी जयकुमार नामेवार तसेच सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत माहिती देण्यात आली की, छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळात छत्रपती संभाजीनगर , बीड, परभणी, नांदेड, जालना, धाराशिव , लातूर, हिंगोली या आठ जिल्ह्यांचा समावेश आहे. तसेच  छत्रपती संभाजीनगर मंडळातर्फे स्थापनेपासून  मार्च २०२३ पर्यंत केलेल्या सदनिका, गाळे इ. बांधकामांची माहिती सादर करण्यात आली. सद्यस्थितीत प्रधानमंत्री आवास योजना, त्यासाठीचे निकष, म्हाडाची त्यातील भूमिका, तसेच सन २०२३-२४ मधील प्रस्तावित बांधकाम कार्यक्रम, उपलब्ध जमिन क्षेत्र इ. मुद्यांवर चर्चा करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर शहर विस्तारात म्हाडामार्फत सर्वसामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध करुन देण्याबाबत करावयाच्या  उपाययोजनांचीही चर्चा यावेळी मंत्री महोदयांनी केली.