सर्वसामान्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे- रावसाहेब दानवे

छत्रपती संभाजीनगर,२१ ऑगस्ट  /प्रतिनिधी :-  केंद्र सरकारच्या  आवास, पाणीपुरवठा, शिक्षण, शहरी विकास अंतर्गत सर्व पायाभूत सुविधा योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळावा यासाठी  सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे व समितीकडे अहवाल सादर करावा, असे निर्देश केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री तथा जिल्हा विकास समन्वय आणि सनियंत्रण (दिशा) समितीचे अध्यक्ष रावसाहेव दानवे यांनी दिले.

दिशा समितीची बैठक आज मनपाच्या स्मार्ट सिटी सभागृहात पार पडली. बैठकीस गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, अल्पसंख्यांक मंत्री अब्दुल सत्तार, विधान परिषदेतील  विरोधी पक्षनेता अंबादास दानवे, लोकसभा सदस्य खासदार इम्तियाज जलील, विधानसभा सदस्य आमदार हरिभाऊ बागडे, आमदार प्रशांत बंब, आमदार संजय शिरसाठ तसेच जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पाण्डेय, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्यासह जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अशोक शिरसे  तसेच सर्व विभाग प्रमुख या उपस्थित होते.  

ग्रामीण पाणी पुरवठा योजनेत, जलजीवन मिशन योजनेअंतर्गत ग्रामीण भागामध्ये सर्वांना ‘हर घर नल से जल’,  तसेच पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सर्वसामान्यांना परवडेल अशा घराची निर्मिती या योजनांचा गती देण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. या योजनांचा लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी आढावा घेण्यात आला. आवास योजनेचे काम करत असताना ग्रामसभा आणि चावडी वाचन करावे.  सर्व यंत्रणाच्या समन्वयातून कामे करावी. तसेच पाणीपुरवठा, आवास योजनेचे काम मार्गी लावावे, असे यावेळी समितीच्या सदस्यांना दानवे यांनी सुचित केले. मागील बैठकीच्या अनुपालन अहवालाचे वाचन करण्यात आले.  स्मार्ट सिटी अंतर्गत येणाऱ्या विविध प्रकल्पाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. नवीन पाणीपुरवठा योजनेत पाईपलाईन अंतर्गत जेथे खोदकाम केले आहेते वेळेत  पूर्ण करावे.  पाण्याच्या टाक्यांच्या बांधकामाचा तसेच राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना, जुन्या आणि मोडकळीस झालेल्या शाळा वर्ग खोल्यांची दुरुस्ती आणि बांधणी यासंदर्भातही आढावा घेतला.   सर्व सामान्यांना पाणीपुरवठा,आवास,  शिक्षण, आरोग्य, त्याचप्रमाणे इतर सुविधाही विविध योजनांच्या माध्यमातून मिळवून देण्यासाठी सर्व विभाग,  यंत्रणांनी जबाबदारीने आणि समन्वयने काम करावे व अहवाल वेळोवेळी तीन महिन्याच्या आत  समितीकडे पाठवावा, असे रावसाहेब दानवे पाटील यांनी निर्देश दिले.