मराठवाड्याच्या हक्काचे पाणी न दिल्यास विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिला आंदोलनाचा इशारा 

मराठवाड्याच्या सिंचन प्रकल्पाबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी घेतली आढावा बैठक

छत्रपती संभाजीनगर,१८ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- शहरातील मराठवाडा गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळ येथे शुक्रवारी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मराठवाड्यासह संभाजीनगर, जालना जिल्ह्याच्या सिंचन प्रकल्प प्रश्नांसंबंधी  अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली.मराठवाड्याला त्याच्या हक्काचे पाणी द्या, नाहीतर जन आंदोलन उभा करू असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

प्रस्तावित पश्चिम नद्यांच्या वाहिन्यातून मराठवाड्याला कशाप्रकारे पाणी वळविता येईल यावर त्यांनी यावेळी चर्चा केली. तसेच प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना व बळीराजा कृषी संजीवनी योजनेचा मराठवाड्याला कशाप्रकारे फायदा झाला याची माहिती त्यांनी घेतली.

संभाजीनगर पाणी प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रस्तावित प्रकल्पांची प्रशासन स्तरावर काय स्थिती आहेत.काम पूर्ण झालेल्या प्रकल्पांची अवस्था आणि मंजूर झालेल्या कामांची पूर्तता कुठपर्यंत आली याची सुद्धा त्यांनी विचारपूस केली…

तसेच जिल्ह्यातील नांदूर प्रकल्पाचे पाणी गंगापूर आणि वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाने देण्याचे ठरविले आहेत. परंतु सिंचन व्यतिरिक्त पाण्यांवरती सरकार आरक्षण वाढत असून यामुळे मराठवाड्यातील जनतेवर अन्याय होत आहे.मराठवाड्याचा पाणी प्रश्न आगामी काळात मी शासन दरबारी मांडणार असून अर्ज आणि विनंत्याद्वारे शासनाने या विषयाचे गांभीर्य घेतले नाही तर येणाऱ्या काळात मोठे जन आंदोलन उभा करू असा इशारा त्यांनी यावेळी सरकारला दिला.

याप्रसंगी कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार,विजय घोगरे, वरिष्ठ अभियंता एस.के. सब्बीनवार,भरत शिंगाडे, लघु पाटबंधारे विभागप्रमुख उमेश वानखेडे, जालना पाटबंधारे विभाग प्रमुख सुरेखा कोरके, कृष्णा घुगे,रोहित देशमुख, शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर, विधानसभा संघटक राजीव वैद्य, तालुकाप्रमुख मनोज पेरे,संजय मोटे व विभाग प्रमुख नरेश भालेराव उपस्थित होते.