छत्रपती संभाजीनगरची दंगल कशी पेटली? पहिल्यांदाच अधिकृत माहिती समोर;गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला सर्व घटनाक्रम

सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे दोषींची शहानिशा करुनच पोलिसांकडून कारवाई -उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

छत्रपती संभाजीनगर,१९ जुलै  / प्रतिनिधी :- राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या जातीय तेढ, विद्वेषात्मक वातावरण निर्माण करणाऱ्या भाषणांवर निर्बंध असून छत्रपती संभाजीनगर येथील प्रकरणात उपलब्ध सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे दोषींची शहानिशा करुनच पोलिसांकडून कारवाई करण्यात आली असल्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करत याबाबत माहिती दिली आहे. तर ही दंगल कशी घडली, त्या दिवशी नेमकं काय झाले आणि पोलिसांनी ही सर्व परिस्थिती कशी हाताळली याबाबत देखील फडणवीस यांनी सभागृहात माहिती दिली आहे. विशेष म्हणजे पोलिसांवर केलेले सर्व आरोप फेटाळून लावत, पोलिसांवर कोणतीच कारवाई होणार नसल्याचे देखील फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. 

छत्रपती संभाजीनगर येथे रामनवमीच्या दिवशी दोन समुदयांमध्ये झालेल्या वादासंदर्भातील सदस्य अबू आझमी यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना गृहमंत्री श्री.फडणवीस बोलत होते.

उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला संपूर्ण घटनेची माहिती दिली. त्या दिवशी नेमके काय घडले, पोलिसांनी स्थिती कशी हाताळली, हे त्यांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांवर कोणतीही कारवाई होणार नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी त्यांना अभयही दिले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्या भागात दंगल घडली तिथे अल्पसंख्यक समुदायाची लोकसंख्या जास्त आहे. तिथेच राम मंदिर आहे. वर्षोनुवर्षे त्या मंदिरात राम नवमी साजरी केली जाते. त्यामुळे राम नवमीच्या आदल्या दिवशी उशिरापर्यंत मंदिर सुरु असते. भाविक त्याठिकाणी येतात.

दंगल घडली त्यावेळी सुरवातीला 3 जण तिथे गेले. परत जाताना त्यांची बाचाबाची झाली. त्यानंतर परिस्थिती शांत झाली. पण 6 जण तिथे पुन्हा आले. त्यावेळी त्यांना मंदिर बंद असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ते परत गेले. पण त्याचवेळी मंदिरात 200 ते 250 जण दबा धरून बसल्याची अफवा पसरवण्यात आली.

हे लपलेले लोक आपल्यावर हल्ला करणार असल्याची खोटी माहिती पसरवली गेली. या अफवेनंतर तिथे मोठा जमाव जमला. प्रत्यक्षात मंदिरात कुणीही नव्हते. पोलिस यंत्रणाही जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते.

पोलिसांनी रबरी गोळ्या झाडल्या

फडणवीस पुढे म्हणाले की, पण पुन्हा तिथे जमाव जमला. घटनास्थळी विटाचा ढीग होता. पोलिसांनी अखेरपर्यंत जमावाला थांबवण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन्हीकडून पोलिसांवर दबाव येत होता. या घटनेत काही पोलिस कर्मचारीही जखमी झालेत. अखेर स्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्यामुळे पोलिसांनी रबर बुलेट चालवल्या. माझ्याकडे या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आहे.

या दंगलीत मृत्युमुखी पडलेला व्यक्ती या जमावाचा भाग होता. पोलिसांनी झाडलेल्या रबरी गोळ्यामुळे त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे पोलिस कारवाईत निष्पाप व्यक्ती ठार झाल्याच्या आरोपात तथ्य नाही. पण दंगल घडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांवर कोणतीही कारवाई होऊ शकत नाही.

मृत व्यक्तीचा दंगलीत सहभाग

किराडपुरा दंगलीत शेख मुनिरुद्दीन मोइनुद्दीन (45) नामक व्यक्ती पोलिसांच्या गोळीबारात जखमी झाला होता. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांनी ते घराच्या आत असताना त्यांना गोळी लागल्याचा दावा केला होता. पण फडणवीसांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. मयत व्यक्तीचा दंगलीत हात होता. तो जमावाचा भाग होता, असे ते म्हणाले.

छत्रपती संभाजीनगर येथील किराडपुरा, या भागात रामनवमीच्या दिवशी दंगा करण्याच्या उद्देशाने कृती करणा-या आरोपींवर गुन्हा दाखल करताना पोलीसांनी त्याठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीच्या आधारे जमावाची शहानिशा करुन संबंधित आरोपींवर कायदेशीर कारवाई केली असल्याचे सांगून गृहमंत्री म्हणाले की, उपलब्ध फुटेजच्या आधारे जेवढे आरोपी निष्पन्न झाले त्यांच्यावर कारवाई केली गेली आहे. तसेच राज्यात विद्वेष पसरवणारी भाषणे करण्यावर निर्बंध असून ज्यांनी यापूर्वी अशा प्रकारे भाषण केल्याची माहिती असेल त्यांना इतर भाषणाच्या वेळी लिखित सूचनेद्वारा, अशा प्रकारे भाषण करु नये याची पूर्वसूचना देण्यात आली असल्याचे ही गृहमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत विधानसभा सदस्य अस्लम शेख, जितेंद्र आव्हाड यांनी सहभाग घेतला.