पर्यटन परिषद आणि वेरुळ महोत्सव समन्वयाने यशस्वी करणार- जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय

छत्रपती संभाजीनगर , १३ जून / प्रतिनिधी :-छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विविध पर्यटनस्थळ असून, पर्यटन वाढीसाठी जिल्हा प्रशासन विविध उपक्रम राबवित आहे. सप्टेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय पर्यटन परिषदेचे आयोजन छत्रपती संभाजीनगर शहरात करण्यात आले आहे. तसेच वेरुळ महोत्सावाचे आयोजन करण्यात येत आहे. हे दोन्ही उपक्रम छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी पर्यटन विकासातील महत्वाचे पाऊल आहे.

यासाठी जिल्हा प्रशासन, महापालिका, पोलीस यंत्रणा आणि पर्यटन विभाग समन्वयाने काम करणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी आज भारत पर्यटन चालक एजन्सी सदस्याच्या आढावा बैठकीत दिली.

या बैठकीत महापालिका आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पर्यटनचे प्रादेशिक उपसंचालक विजय जाधव, राज्य उत्पादन शुल्कचे अधिक्षक संतोष झगडे, छत्रपती संभाजीनगर पर्यटन विकास संस्थेचे जसवंत सिंग यांच्यासह राजीव मेहरा, रवी गोसावी आदी पर्यटन श्रेत्रातील संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सप्टेंबर 2023 मध्ये होणाऱ्या जागतिक पर्यटन परिषदेचे आयोजन औरंगाबाद येथे करण्यात येणार असून यामध्ये एक हजार टुर ऑपरेटरचा सहभाग राहणार असल्याने त्यांच्या  राहण्याच्या व इतर सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत संबधित विभागांना सूचित करण्यात आले आहे. यासाठी महापालिकेकडून कार्यक्रम स्थळाचे फायर ऑडिट करुन सुरुक्षाबाबतची कार्यवाही करावी. तसेच शहराचे ब्रॅन्डींग करण्यासाठी डिजिटल होर्डिंगच्या माध्यमातून जिल्ह्यातील पर्यटनस्थळ, संस्कृती याविषयची माहिती देण्याबरोबर  निमंत्रितांचे स्वागत, आदरआतिथ्य करण्याबाबत तयारीचा आढावा यावेळी जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी घेतला.

या आढावा बैठकीत मुंबईतून दूरदृष्यप्रणालीद्वारे लोकसेवा हक्क आयोगाचे आयुक्त दिलिप शिंदे यांनी सहभाग घेतला होता. यावेळी वेरुळ महोत्सव शक्य तो सुट्टीच्या काळात आयोजित करावा, जेणेकरुन पालक, विद्यार्थी अधिक संख्येने सहभागी होतील. अशी सूचना श्री.शिंदे यांनी जिल्हा प्रशासनास केली. यावेळी पर्यटन परिषद आणि वेरुळ महोत्सवादरम्यान सांस्कृतिक आयोजनाबाबतही चर्चा करण्यात आली.