सुट्टीच्या दिवशीही वीजबिल भरणा केंद्रे सुरू

छत्रपती संभाजीनगर,२९ मार्च  / प्रतिनिधी :-  ग्राहकांना वीजबिलाचा भरणा करणे अधिक सुलभ होण्यासाठी छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील महावितरणची सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही 30 मार्च तसेच 1 व 2‍ एप्रिल 2023 रोजी सुरू राहतील.या उपलब्ध सुविधेसह डिजिटल माध्यमातून ग्राहकांनी आपल्या चालू व थकीत वीजबिलाचा भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे
    अधिकृत वीजबिल भरणा केंद्राशिवाय महावितरणच्या मोबाईल ॲपवर वीजबिल भरणा तसेच इतर सर्व सुविधा उपलब्ध आहेत. www.mahadiscom.in या संकेतस्थळावर केवळ बारा अंकी ग्राहक क्रमांक नमूद करून नेट बँकिंग, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड आदींच्या माध्यमातून वीजबिल भरता येते. याशिवाय विविध पेमेंट वॉलेटचा उपयोग करून घरबसल्या वीजबिलाचा ऑनलाईन भरणा करण्याची सुविधा आहे. तसेच वीजबिलावर दिलेला क्यूआर कोड स्कॅन करूनही थेट पेमेंट गेटवेवर जाऊन वीजबिल भरण्याचीही सोय आहे. अखंडित वीज सेवेसाठी उपलब्ध सुविधांचा उपयोग करून चालू व थकीत वीजबिलाचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.