वर्धापनदिन सोहळ्याने महावितरण कर्मचाऱ्यांना ‍मिळाली नवी ऊर्जा

छत्रपती संभाजीनगर , ८ जून / प्रतिनिधी :- कथाकथन, एकपात्री नाट्यप्रयोग, सांस्कृतिक कार्यक्रम, महिलांसाठी खेळ अशा भरगच्च कार्यक्रमांनी मंगळवारी (6 जून) महावितरणचा 18 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांच्या हस्ते केक कापून आनंद साजरा करण्यात आला. ग्राहकांना अविश्रांत सेवा देणाऱ्या महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना या सोहळ्यामुळे नवी ऊर्जा मिळाली.

          छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.मंगेश गोंदावले, छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे मुख्य अभियंता डॉ.मुरहरी केळे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात हा सोहळा रंगला. याप्रसंगी डॉ.गोंदावले म्हणाले की, गेल्या 18 वर्षात महावितरणने विविध पातळ्यांवर उत्तम प्रगती केली आहे. गतवर्षी कंपनीने 75 हजार कोटी रुपयांची वीजबिल वसुली केली आहे. याचे याचे श्रेय सर्व कर्मचाऱ्यांचे आहे.‍ त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे महावितरणला वर्षभरात विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले. विद्युत अपघातांचे प्रमाण कमी केल्याबद्दल नुकताच पुरस्कार मिळाला आहे. मात्र एवढ्यावरच न थांबताअपघातमुक्त महावितरण हे ध्येय ठेवून कर्मचाऱ्यांनी विद्युत सुरक्षेस सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

          मुख्य अभियंता डॉ.केळे म्हणाले की, विद्युत क्षेत्रातील बदलत्या धोरणामुळे खासगी कंपन्या येऊ घातल्या आहेत. त्यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांना सक्षम व्हावे लागेल. कंपनीला 18 वर्ष पूर्ण झाली असून आता आपण प्रौढ झालो आहोत, त्यानुसार आपले वागणे आणखी जास्त जबाबदारीचे असणे जनतेला अपेक्षित आहे. डॉ.केळे यांनी संत तुकारामांच्या अभंगातील दाखले देत विजेचा नि:पक्षपातीपणा आणि विजेच्या बचतीचे बचतीचे महत्त्व पटवून दिले.

          यावेळी दीक्षा सोनवणे यांनी विविध ख्रेळ व स्पर्धा घेऊन महिलांचा उत्साह वाढवला. प्रा.रवींद्र कोकरे यांच्या खुमासदार शैलीतील कथाकथनाने कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवले. संदीप पाचंगे यांच्या ‘चुकीला माफी नाही’ या एकपात्री प्रयोगाने विद्युत सुरक्षेचे महत्त्व पटवून दिले. दिलीप खंडेराय व संचाने सादर केलेल्या ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. ‘ज्युनिअर चार्ली’ सोमनाथ स्वभावणे यांनी बच्चे कंपनीचे मनोरंजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपकार्यकारी अभियंता अविनाश सानप यांनी केले.

          निबंध स्पर्धेतील विजेते नवनाथ पवार, राजेंद्र राठोड, नितीन सूर्यवंशी (कर्मचारी गट) आणि यज्ञेश चौधरी, कल्याणी चव्हाण, राजेश्री ‍शिंदे (पाल्य गट) यांना गौरवण्यात आले. प्रा.डॉ.रमेश औताडे यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. वर्धापनदिनी पथनाट्य सादर करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही याप्रसंगी सन्मान करण्यात आला. अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय यंत्र अभियांत्रिकी ‍परिषदेसाठी निवड झाल्याबद्दल कर्मचारी नितीन सूर्यवंशी यांचा मुलगा स्वराज याचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.गोंदावले यांनी रोख 10 हजार रुपये देऊन कौतुक केले.

          कार्यक्रमास अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली, मोहन काळोगे, उत्क्रांत धायगुडे, सतीश खाकसे, उपसंचालक सतीश कापडणी, सहायक महाव्यवस्थापक ‍शिल्पा काबरा, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी विश्वास पाटील, कार्यकारी अभियंता दीपक सोनोने, प्रेमसिंग राजपूत, महेश पाटील, भूषण पहूरकर यांच्यासह महावितरणचे अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याचा आनंद घेतला.