‘त्या’ पदांकरिता निवडीचे प्रमाण 16 पट ऐवजी 20 पट करा

आ.सतीश चव्हाण यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी

छत्रपती संभाजीनगर,२० जुलै  / प्रतिनिधी :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने 8 ऑक्टोबर 2022 रोजी झालेल्या संयुक्त गट-ब पूर्व परीक्षेचा निकालात निवडीचे प्रमाण 16 पट ऐवजी 20 पट करावे अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आज (दि.20) केली आहे.

    आ.सतीश चव्हाण यांनी आज विधी मंडळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भात निवेदन दिले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने एसटीआय, एएसओ, पीएसआय पदांकरिता 8 ऑक्टोबर 2022 रोजी झालेल्या संयुक्त गट-ब पूर्व परीक्षेचा निकाल जवळपास दहा महिन्यांनी उशीरा जाहीर करण्यात आला. त्यात सदरील पीएसआय पदांच्या निकालाचा कट ऑफ वाढला असून मुख्य परीक्षेसाठी 16 पटच उमेदवार पात्र करण्यात आले आहे. यापूर्वीच्या संयुक्त गट-ब पूर्व परीक्षेत 22 पट पर्यंत उमेदवार आयोगाने मुख्य परीक्षेसाठी पात्र केले आहेत. मात्र ऑक्टोबर 2022 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत हा निकष 16 पटच घेण्यात आला. त्यामुळे असं‘य विद्यार्थी पूर्व परीक्षा निकालात 0.5 ते 2.0 इतक्या कमी गुणांनी अपात्र ठरत असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आणून देत विद्यार्थी हित लक्षात घेता सदर परीक्षेचा निकालात निवडीचे प्रमाण 16 पट ऐवजी 20 पट करावे अशी आग्रही मागणी केली.

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आ.सतीश चव्हाण यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत यासंदर्भात त्वरीत लक्ष घालण्याचे आश्वस्त केले.