किराडपुरा दंगली प्रकरणात एका आरोपीला पोलिस कोठडी 

छत्रपती संभाजीनगर,९  एप्रिल / प्रतिनिधी :-  छत्रपती संभाजीनगरातील किराडपुरा भागात झालेल्या दंगलीप्रकरणात विशेष तपास पथकाने शनिवारी दि.८ रात्री आरोपी सय्यद मुज्जमील सय्यद अन्‍वर (२०, रा. नारेगाव) याच्‍या मुसक्या आवळल्या. त्‍याला ११ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी एस.एम. बोहरा यांनी रविवारी दि.९ एप्रिल रोजी दिले.

गुन्‍हा हा गंभीर स्‍वरुपाचा आहे. अटक आरोपींकडून त्‍यांच्‍या साथीदारांची नाव निष्‍पन्‍न होत आहेत, आणखी नावे निष्‍पन्‍न होण्‍याची शक्यता आहे. गुन्‍ह्यात वापरलेले लाठ्या-काठ्या, सळ्या हस्‍तगत करायचे आहेत. त्‍याचप्रमाणे गुन्‍हा करण्‍यासाठी आरोपींना कोणी चिथावणी दिली होती का? तसेच गुन्‍हा करण्‍यामागे आरोपींचा नेमका हेतु काय होता ? याचा देखील तपास बाकी असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्‍याची विनंती सहायक सरकारी वकील समीर बेदरे यांनी न्‍यायालयाकडे केली होती.