मराठवाड्याला वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा तडाखा ; वीज पडून चौघांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर,९  एप्रिल / प्रतिनिधी :-  गेल्या तीन दिवसांत मराठवाड्याला  अवकाळी पावसाने झोडपले. त्यामुळे फळपिकांना मोठा फटका बसला आहे.अवकाळी पावसामुळे छत्रपती संभाजीनगर, हिंगोली,परभणी आणि बीडमध्ये वीज पडून प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.जालना, हिंगोली, धाराशिव, नांदेड जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. बीड जिल्ह्यातील काही भागांत जोरदार पाऊस व गारपीट झाली.   मराठवड्यात या तीन  दिवसांत एकूण ५४ जनावराचा मृत्यू झाला आहे. तसेच अजूनही अनेक शेतकऱ्यांची रब्बीची पिके शेतात उभी असून, काहींनी पिके काढून गंजी लावली आहे. त्यामुळे या अशा पिकांचे देखील अवकाळीमुळे मोठं नुकसान झाले आहे. 

अवकाळी पावसादरम्यान वीज पडून चौघांचा मृत्यू झाला आहे. ज्यात छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील शिरसाळा येथील आबादान भिका राठोड (वय 27 वर्षे) या युवकाचा वीज पडून मृत्यू झाला आहे. तर परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील मांडेवडगाव येथील इंदुमती नारायण होडे (वय 60 वर्षे) या शेतात कापूस वेचत असताना सकाळी साडेआठच्या सुमारास त्यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. तसेच बीडच्या आष्टी तालुक्यातील सूरडी गावातील शेतकरी महादेव किसन गर्जे (वय 60 वर्षे) शेतात शेळ्या चरण्यासाठी गेले असता पाऊस सुरु झाला. त्यामुळे आश्रयासाठी ते झाडाखाली थांबले असताना त्यांच्यावर वीज पडली. ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर आणखी एका घटनेत हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यातील बोरजा येथील शेतात हळद गोळा करणाऱ्या पिराजी विठ्ठल चव्हाण (वय वय 33 वर्षे) यांचाही वीज पडून मृत्यू झाला आहे. 

वैजापूर तालुक्यात वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा तडाखा ; रब्बी पिकांचे नुकसान

वैजापूर ,९ एप्रिल  / प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील डोंगरथडी व गंगथडीसह अन्य भागात रविवारी (ता.09) रात्री विजेचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी वारे, पाऊस आणि गारपिटीने रब्बीसह भाजीपाला व फळ पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. 

आज सकाळपासूनच तालुक्यात ढगाळ वातावरण होते. रात्री तालुक्यातील डोंगरथडी भागातील वाकला व शिऊर परिसरासह पोखरी, गारज, बाभूळगांव खुर्द, बाभूळगांव पिराचे, शिवगांव, वाघला, भटाणा, जांबरखेडा, लाखणी आदी गावांमध्ये वादळी वाऱ्यासह जोराचा पाऊस झाला. तर गंगथडी भागातही विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. वादळी वारा व पावसामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला होता. या वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांसह भाजीपाला व फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.शहर व परिसरातही काही ठिकाणी हलक्या तर काही ठिकाणी जोराच्या सरी पडल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता.