चित्रकार मुरली लाहोटी यांची महात्मा गांधी मराठवाडा भूषण पुरस्कार साठी निवड

परळी,१३ सप्टेंबर /प्रतिनिधी :-  मराठवाड्यातील परळीचे सुपुत्र व पुणे येथे  स्थाईक झालेले जगप्रसिध्द चित्रकार मुरली लाहोटी यांची निवड महात्मा गांधी मराठवाडा भूषण पुरस्कारासाठी झाली आहे. महात्मा गांधी मिशन विद्यापीठ  औरंगाबादच्या पुरस्कार निवड समिती अध्यक्ष प्रतापराव बोराडे यांनी ही निवड जाहीर केली असून हा पुरस्कार ९ ऑक्टोबर रोजी प्रदान करण्यात येणार असल्याचे त्यांनी कळविले आहे.

     वैद्यकीय, अभियांत्रिकी, पत्रकारिता, कृषी आदी व्यवसायाभिमुख शिक्षणासाठी अग्रगण्य असलेल्या महात्मा गांधी मिशन औरंगाबाद या संस्थेने या वर्षीपासून सांस्कृतिक, सामाजिक, आणि कृषी क्षेत्रात आपला असामान्य व जनमान्य ठसा उमटवना-या एका कर्तुत्ववान मराठवाडा सुपुत्र असलेला भूमीपुत्रास महात्मा गांधी मराठवाडा भूषण पुरस्कार देण्याचे ठरविले असून या साठी प्रतापराव बोराडे यांच्या अध्यक्षतेखाली एका निवड समितीने पहिल्या पुरस्कारासाठी जगविख्यात सुप्रसिद्ध चित्रकार मुरली लाहोटी यांची निवड केली आहे. पुरस्काराचे स्वरूप शाल,श्रीफळ, स्मृतिचिन्ह व रुपये पन्नास हजार असा आहे. हा पुरस्कार सोहळा महात्मा गांधी जयंती सप्ताहात ९ ऑक्टोबर रोजी औरंगाबाद येथे होणार आहे. 

चित्रकार मुरली लाहोटी हे परळी वैजनाथ चे सुपुत्र असून त्यांनी नुकतेच आपल्या वयाची ८० वर्ष पूर्ण करून ८१ व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यांच्या ८० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सह्याद्री दूरदर्शनवर त्यांची प्रदीर्घ मुलाखत प्रसारित केली होती. चित्रकार म्हणून त्यांनी आपल्या चित्रांचे १५० पेक्षा जास्त एकल प्रदर्शन भरवून एक जागतिक विक्रम केला आहे. घरचे वातावरण कला शिक्षणासाठी अनुकूल नसताना त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण करून मोठ्या पदाची नौकरी मिळत असतानाही चित्रकार म्हणून राहण्याचे त्यांनी स्वीकारले. राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित मुरली लाहोटी यांना आतापर्यंत अनेक पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आले असून महात्मा गांधी मराठवाडा भूषण हा पुरस्कार म्हणजे मानाचा मुकुट होय.