अतिवृष्टीमुळे नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही — महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार

बीड, दि. १९ ::– शेतकऱ्यांना मदत करण्याची राज्य शासनाची भूमिका आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमध्ये वेळ प्रसंगी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य शासनाची कर्ज घेण्याची देखील शासनाची मानसिकता असून नुकसान झालेला एकही शेतकरी या मदतीपासून वंचित राहणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे महसूल, ग्राम विकास, बंदरे, खार जमीनी विकास व विशेष सहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.

अतिवृष्टीच्या पावसामुळे जिल्ह्यातील पिकांचे झालेले नुकसान पाहणी करण्यासाठी महसूल राज्यमंत्री श्री.सत्तार बीड जिल्हा दौऱ्यावर आले होते. जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे त्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा पोलीस अधीक्षक आर. राजा, माजी राज्यमंत्री श्री. बदामराव पंडित, श्री. कुंडलिक खांडे , श्री. सचिन मुळीक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर यासह विविध शासकीय अधिकारी उपस्थित होते.

राज्यमंत्री श्री. सत्तार म्हणाले, सध्या समोर येत असलेले नुकसानीचे आकडे अंतिम नाहीत पंचनामे सुरू असून जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये जवळपास सरासरीच्या एकशे तीस टक्के पर्यंत पाऊस झाल्यामुळे मोठी नुकसान झाली आहे. पाहणी पंचनामे यातील आकडेवारीत व नुकसानीत वाढ होईल शेतांमध्ये पाणी साचले असून जाण्यासारखी देखील स्थिती राहिलेली नाही. मराठवाड्यातील बीड सह उस्मानाबाद, लातूर, जालना जिल्ह्यात देखील अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. बीड जिल्ह्यात कापूस व सोयाबीन ची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली होती. त्या उत्पादनाला मोठा फटका बसला आहे त्या खालोखाल मूग, उडीद, ज्वारी, पपई आदी विविध प्रकारच्या पिकांमुळे शेतकऱ्यांना नुकसानीस सामोरे जावे लागत आहे असे श्री. सत्तार यांनी सांगितले.

ते म्हणाले, केंद्र सरकार कडून देखील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मागणी राज्य सरकारकडून केली आहे. शेतकऱ्यांवर अनेक अस्मानी संकट येत असतात त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी शासन यंत्रणेने काम करण्याची गरज आहे यासाठी आनेवारी, पिक कापणी प्रयोग आदी प्रसंगी संवेदनशीलपणे काम करण्याची गरज आहे. प्रत्यक्षात शेतामध्ये जाऊन पंचनामे करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले. याच बरोबर शेतकरी स्वतः देखील आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे मोबाईल ॲप द्वारे स्वतः झालेल्या नुकसानीचा फोटो व व्हिडीओ अपलोड करून त्याची माहिती देऊ शकतात असे त्यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या बैठकीत जिल्हा कृषी अधिकारी श्री. निकम यांनी बीड जिल्ह्यात ७ लक्ष ७६ हजार हेक्टर क्षेत्रापैकी ७ लक्ष ५२ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती व यापैकी कापूस व सोयाबीन या पिकांचे क्षेत्र साडे पाच लक्ष हेक्टर पेक्षा जास्त होते. याच बरोबर तूर , उडीद, मूग आदी क्षेत्रावर देखील पेरणी झाली होती. असे सांगून अतिवृष्टीमुळे मोठ्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज देण्यात आला.

अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे आज जिल्ह्यात आगमन झाले त्यांनी गेवराई आणि बीड तालुक्यातील गावांना भेटी दिल्या.गेवराई तालुक्यातील पांढरवाडी येथील शेतकरी संभाजी मारुतीराव मुळे यांच्या पावसाने नुकसान झालेल्या कपाशीच्या शेतीचे मा महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार प्रत्यक्ष भेट देऊन पहाणी केली.पाचेगाव येथील शेतकरी विश्वंभर पंढरीनाथ बरबडे यांच्या पावसाने नुकसान झालेल्या कपाशीच्या शेतीची प्रत्यक्ष पहाणी केली . शेतकरी श्री बरबडे यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतली. पाडळसिंगी येथील शेतकरी रामप्रसाद ज्ञानदेव साबळे यांच्या पावसाने नुकसान झालेल्या कपाशीच्या शेतीची पाहणी करून संवाद साधला.बीड तालुक्यातील किन्ही पाई येथील शेतकरी मीना नंदकुमार सावंत आणि लोळदगाव येथील हरिदास पाटील यांच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतीचे महसूल राज्यमंत्री श्री. सत्तार यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पहाणी केली संबंधित शेतकरी यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतली.या दौऱ्यामध्ये माजी राज्यमंत्री बदामराव पंडित, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, कुंडली खांडे, सचिन मूळुक, युधाजित पंडित, उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर यांच्यासह पदाधिकारी शेतकरी उपस्थित होते.