कंन्टेन्टमेंट झोनमध्ये अधिक कडक निर्बंध लागू करा- पालकमंत्री राजेश टोपे

  • जिल्ह्यात एकाही रुग्णांचा कोव्हीडमुळे मृत्यू होणार नाही याची दक्षता घ्या
  • जिल्हा वासियांनो जिल्हा प्रशासनाच्या सुचनांचे पालन करा
  • रुग्णांचा शोध, तपासणी व उपचार याचा प्रभावी वापर करा

जालना, दि. 6 :- जालना जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. तसेच चार कोव्हीडबाधितांचा मृत्यूही झाला आहे. ही अतिशय चिंतेची बाब असुन रुग्णांचा शोध, तपासणी व उपचार याचा प्रभावीपणे वापर करावा. कोव्हीड बाधितांच्या उपचारासाठी आवश्यकता भासल्यास टेलिआयसीयु अथवा मुंबई येथील तज्ज्ञ डॉक्टरांची मदत घेण्यात यावी. कोव्हीडमुळे एकाही रुग्णाचा मृत्यू होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयएमए व जिल्हा प्रशासनातील अधिकारी व डॉक्टर्स यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री टोपे बोलत होते. यावेळी आमदार कैलास गोरंट्याल, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम.के. राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी श्री कडले, डॉ. संजय राख, डॉ. रायठठ्ठा, डॉ. मोजेस, डॉ. जगन्नाथ खंडागळे, डॉ. बागल, डॉ. रितेश अग्रवाल, डॉ. साबळे, डॉ. पाकनीकर, डॉ. दीपक मंत्री, डॉ. निलेश अग्रवाल, डॉ. मणियार, डॉ. करवा आदींची उपस्थिती होती.

पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले, जिल्ह्यात कोव्हीड बाधितांचा आकडवा वाढत आहे. ही अतिशय चिंतेची बाब आहे. कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला भाग हा कंन्टेन्टमेंट झोन म्हणून घोषित करुन या भागातुन एकही नागरिक विनाकारण घराबाहेर पडणार नाही, याची काटेकोरपणे दक्षता घेण्यात यावी. या भागात कडक निर्बंध लागू करण्यात यावेत. कोव्हीड बाधिताच्या संपर्कातील हायरिस्क व लोरिस्क सहवासितांचा शोध अचुकपणे घेण्यात यावा. त्याचबरोबर मधुमेह, ऱ्हदयरोग असे आजार असलेल्या वयोवृद्ध व्यक्ती व ज्यांना सर्दी, ताप, खोकला यासारखी लक्षणे आहे अशा व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचे तातडीने संस्थात्मक अलगीकरण करण्याबरोबरच वेळप्रसंगी अशा व्यक्तींना रुग्णालयात दाखल करुन त्यांच्यावर उपचार सुरु करण्याचे निर्देशही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी दिले. जिल्ह्यात परराज्य, परजिल्ह्यात अनेक व्यक्ती येत आहेत. अशा व्यक्ती जिल्ह्यात दाखल होताच त्यांचे अलगीकरण करण्यात यावे. प्रत्येक अलगीकरण केंद्रामध्ये पल्स ऑक्सीमीटर ठेवण्यात येऊन दैनंदिन अलगीकरण करण्यात आलेल्या व्यक्तींची तपासणी करण्याचे निर्देश देत रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक ती साधनसामग्री तसेच औषधींची कमतरता भासु दिली जाणार नसल्याचेही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी सांगितले.

आएमए व शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी टीमवर्कने काम करावे जिल्ह्यातील वाढता कोरोनाबाधितांचा आकडा कमी करण्यासाठी तसेच कोव्हीडमुळे रुग्णांना मृत्यू होऊ नये यासाठी आयएमए व शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे येऊन कोरोनाबाधितांवर उपचार करावेत. आयएमए मधील डॉक्टरांनी त्यांच्या खासगी सेवेबरोबरच कोव्हीड बाधित रुग्णांच्या सेवेसाठी पुरेशा प्रमाणात वेळ द्यावा. कोव्हीड बाधितांच्या उपचारासाठी आवश्यकता भासल्यास मुंबई येथील तज्ज्ञ डॉक्टरांची मदत घेण्याची सुचना करत आयएमएसाठी पालकमंत्र्यांच्यावतीने दीड हजार किटस व एन-95 मास्क उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी सांगितले. आरटी-पीसीआर प्रयोगशाळा तातडीने कार्यान्वित करा कोरोना चाचण्यांसाठी जालना येथे आरटी-पीसीआर प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी मान्यता मिळाली असुन या प्रयोगशाळेच्या उभारणीसाठी सुमारे सव्वा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या प्रयोगशाळेमुळे जालना येथील रुग्णांचे नमुने औरंगाबाद येथे तपासणीसाठी आवश्यकता भासणार नाही. संशयित व्यक्तीच्या लाळेच्या नमुन्यांचे अहवाल तातडीने या प्रयोगशाळेमुळे उपलब्ध होणार असल्याने बाधितांना त्वरेने उपचार देता येणार आहेत. त्यामुळे ही प्रयोगशाळा तातडीने कार्यान्वित करण्यासाठी अधिकाऱ्यांनी कार्यवाही करण्याचे निर्देशही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी आरोग्य विभागास दिले.

नागरिकांनी प्रशासनाच्या सुचनांचे पालन करुन सहकार्य करावे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परंतु आजघडीला भाजीमंडई, मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ दिसुन येत आहे. अत्यावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी बाहेर जाताना सामाजिक अंतराचे पालन करणे, मास्कचा, सॅनिटायजर यांचा वापर करण्याबरोबरच कोरोनाला जिल्ह्यातुन हद्दपार करण्यासाठी प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सुचनांचे नागरिकांनी पालन करण्याचे आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी केले.परराज्य, परजिल्ह्यातुन येणाऱ्या नागरिकांनी त्यांची माहिती प्रशासनास द्यावीजे नागरिक परराज्य, परजिल्ह्यातुन जालना जिल्ह्यात येत आहेत, अशा व्यक्तींनी त्यांची माहिती जिल्हा प्रशासनास द्यावी. जेणेकरुन त्यांची तपासणी करुन त्यांच्यावर आवश्यक ते उपचार करणे प्रशासनाला शक्य होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होणार असल्याचेही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी सांगितले.पीककर्ज, कापुस खरेदी, नैसर्गिक आपत्ती अनुदान या बैठकीमध्ये पालकमंत्री श्री टोपे यांनी पीककर्ज वितरण, कापुस खरेदी, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान या बाबींचाही उपस्थित अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. जिल्ह्यातील प्रत्येक गरजु शेतकऱ्याला पीककर्जाचे वितरण झाले पाहिजे. यासाठी बँक अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात याव्यात. पीककर्जापासुन एकही शेतकरी वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीकवलेला कापुसन पडून राहणार नाही, याबाबतीतही दक्षता घेण्याबरोबरच अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाईची रक्कम देण्याचे निर्देशही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *