जलसाठ्याला ‘अल निनोचा’ धोका: वैजापूर तालुक्यातील जलसाठ्यांचे जलसंपदा विभागाकडून नियोजन सुरू

वैजापूर ,​९​ एप्रिल  / प्रतिनिधी :- ‘अल निनो’ मुळे पर्जन्यमानावर परिणाम होण्यासह चालू उन्हाळ्यात उष्णतेची तीव्र लाट येण्याची संभावना आहे. त्यामुळे प्रकल्पातील पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन होऊन जलसाठा मोठ्या प्रमाणात खालावण्याची शक्यता आहे. परिणामी आगामी काळात पाणीटंचाईची स्थिती सर्वसाधारण स्थितीपेक्षा अधिक गंभीर होऊ शकते. या पार्श्वभूमीवर शासनाच्या पाणीपुरवठा विभागाने केलेल्या सूचनेनुसार येथील जलसंपदा विभागानेही तालुक्यात उपाययोजना सुरु केली आहे.

मागील काही दिवसांपासून दक्षिण पॅसिफिक महासागरात ‘अल निनो’ हा समुद्री प्रवाह सक्रिय झाला असून, त्याचा  मान्सून पर्जन्यमानावर वाईट परिणाम होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवीला आहे.’अल निनो’ मुळे होणारा परिणाम लक्षात घेता जून महिन्यानंतरही पाणीटंचाई जाणवण्याची भीती आहे. संभाव्य पाणीटंचाईवर नियंत्रणासाठी विशेष उपाययोजना करण्याचे व उष्णतेच्या लाटांबाबतची खबरदारी घेण्यासाठी आवश्यक उपाय योजनांच्या सुचना राज्याच्या पाणीपुरवठा विभागाने तालुक्यातील वनविभाग, नगर परिषद मुख्याधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

या उपाययोजनांच्या सूचना

पिण्याच्या पाण्यासह गुरांसाठी पाण्याची गरज लक्षात घेता धरणातील पाणीसाठ्याचे सिंचन व इतर प्रयोजनासाठी नियोजित आवर्तनाचे पुनर्विलोकन करणे, पाणी पुरवठ्यासाठी गाये, वस्त्या, पाण्याच्या स्त्रोताचे  आराखडे तयार करणे, ज्या धरणातून ग्रामीण व शहरी भागांत पाणी पुरवठा होतो. अशा धरणातील पाणीसाठा आधीच कमी असेल, तर पाणी वापराच्या सर्व प्रयोजनासाठी काही अंशी पाणी कपात करणे. संभाव्य दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत रोजगार निर्मितीसाठी विशेष नियोजन करणे. जलयुक्त शिवार, अटल भूजल योजना, वॉटर हॉर्वेस्टिंग व कॅच द रेन या योजना अभियान स्वरूपात राबवणे.वन्यप्राण्यांकरीता पाणवठ्यातील जलपातळीवर लक्ष देणे, तसेच पाणी पुरवठ्यासाठी आपत्कालीन आराखडा तयार करणे हातपंप, विंधन विहिरी योग्यरित्या कार्यरत राहतील यासाठी दुरुस्तीच्या उपाययोजनांची कामे हाती घेणे, उष्णता वाढल्यास वनक्षेत्रामध्ये फायर लाईन्स निश्चित करण्यासंदर्भात तयारी करणे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत चालवण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा योजनांतील पाण्याचा स्त्रोत ऑगस्टपर्यंत शाश्वत राहण्याची खात्री करणे.

————————————————————————-

“अल निनो’ हा समुद्री प्रवाह सक्रिय झाल्यामुळे वातावरणात विषम बदल होणार आहेत. त्यात एप्रिल ते जून दरम्यान उष्णतेतही वाढ होणार असल्याने प्रकल्पातील पाणी साठा झपाट्याने कमी होणार आहे. त्यामुळे जनतेला पुढील काळात पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागेल.

राकेश गुजरे,कार्यकारी अभियंता जलसंपदा वैजापूर