वैजापूर तालुक्यात अकरा ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका जाहीर

१८ मे रोजी होणार मतदान : आदर्श आचारसंहिता लागू

वैजापूर ,​९​ एप्रिल  / प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींच्या ११ जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यात आगामी २५ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून, १८ मे रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणुका ओबीसी आरक्षणासह होणार असून, आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

विद्यमान ग्रामपंचायत सरपंच अथवा सदस्यांचे अनर्ह निधन, राजीनामा किंवा अन्य कारणामुळे त्यांच्या जागा रिक्त झाल्या होत्या अशा राज्यातील ३ हजार ३६६ ग्रामपंचायत सदस्यांच्या जागांची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. तत्पूर्वी, ९ मार्च २०२३ रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली होती. गुरुवारी राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची अधिसूचना काढली. त्यात पंचवार्षिक कालावधी संपण्यास ६ महिन्यांचा अवधी शिल्लक असलेल्या सदस्यांच्या निवडणुकीचा समावेश केलेला नाही. तरीही वैजापूर तालुक्यामध्ये

११ ग्रामंचायतींमध्ये ११ सदस्यांच्या जागा रिक्त होत्या. त्यांच्या निवडणुकीची नोटीस १८ एप्रिल रोजी तहसीलदारांकडून काढण्यात येईल. त्यानंतर आगामी २५ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. पुढे त्यांना २ मेपर्यंत मुदत दिली असून, सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागात नामनिर्देशनपत्र दाखल करता येतील. हे अर्ज पारंपरिक पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत. दुसऱ्या दिवशी म्हणजे ३ मे रोजी प्राप्त अर्जांची छाननी सकाळी ११ वाजता करून वैध नामनिर्देशन पत्राची यादी जाहीर करण्यात येईल. ८ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेत असून, त्यानंतर अंतिम उमेदवारांच यादी जाहीर करण्यात येणार आहे. १८ मे रोजी सकाळी साडेआठ सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदारांना हक्क बजावता येणार आहे.

…अशी आहे अकडेवारी

ग्रामपंचायत – ११

सदस्यांच्या रिक्त संख्या – ११

या गावात होणार पोट निवडणूक…

भादली, भालगाव,लाखगंगा, मालेगाव, नादी, नालेगाव, निमगाव- गोदगाव, रघुनाथपूरवाडी,टेभी- कौटगाव, वडजी, वाकला.

आचारसंहिता लागू

निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केलेल्या ग्रामपंचायतीच्या गावात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली. ती निवडणूक संपेपर्यंत लागू राहील. तोपर्यंत ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात मतदारांवर विपरीत प्रभाव टाकणारी कोणतीही कृती अथवा घोषणा मंत्री, खासदार, आमदार किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकाऱ्यांना करता येणार नाही.असे नायब तहसीलदार के.जे.कुलकर्णी यांनी सांगितले.