वैजापूरच्या शिवसेना मेळाव्यात स्वपक्षीयांकडून शाब्दिक हल्ला ; आ. बोरणारे संतापले

वैजापूर ,२९ जून  /प्रतिनिधी :- बोलणारे ! : खैरे किती निष्ठावंत, हे मला माहिती आहे; गलांडेंचे गुडघ्याला बाशिंग! आल्यावर सगळ्यांना बघतो; आ. बोरनारे यांचे प्रत्युत्तर..! बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या आढावा बैठकीत स्वपक्षीय आणि स्वकीयांकडून झालेल्या शाब्दिक हल्लाबोलामुळे आमदार रमेश बोरनारे संतापले आहेत.

खासगी यू-ट्यूब चॅनेलशी बोलताना बोरनारे यांनी मेळाव्यात त्यांच्याविरोधात वक्तव्ये करणाऱ्या सर्वांचेच उणे-दुणे काढतानाच मी तिथे (वैजापूरला) आल्यावर बघतो ना, असा दमच भरला. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्याबाबत बोलताना बोरनारे यांनी ‘खैरे किती निष्ठावंत आहेत, हे मला माहित आहे’ असा उल्लेख केला तर जिल्हा परिषदेचे माजी सभापती अविनाश गलांडे यांना मी काय करीत आहे, याची माहिती होती. त्यांच्याशी बोलणेही झाले होते, असे सांगून त्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधल्यासारखी अशी खालच्या स्तरावरील टीका करायला नको होती, असेही म्हटले. 

एनआरटी या यु ट्यूब चॅनेलने आ. बोरनारे यांच्याशी संपर्क साधला होता. यावेळी बोलताना आमदार रमेश बोरनारे यांनी राज्यापासून ते तालुक्यापर्यंत सर्वांचेच उणे-दुणे काढले. यात सर्वप्रथम माजी खासदार चंद्रकात खैरे यांचे एकेरी नाव घेत ‘खैरे किती निष्ठावंत आहे आणि त्यांनी काय-काय केले ते मला माहीत आहे. मी तिथे आल्यावर बघतो ना!’ असा दम भरला. तसेच निवडणुकीच्या वेळी अनेकांनी विरोधात काम केले. त्यांनाही बघून घेण्याचे संकेत आ. बोरनारे यांनी या संवादात दिले. 
यापुढे राज्यपातळीवर बोलताना बोरनारे यांनी उद्धव ठाकरे यांच्या आजूबाजूच्या लोकांनी पक्ष शून्य करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगत २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी भाजपच्या लोकांनी मला केलेली मदत व माझे २५ वर्षाच्या कामावर मी निवडून आलो, असे स्पष्ट केले. 
चर्चा केली होती… अविनाश गलांडे यांनी आ. बोरनारे यांनी दोन कोटी रुपये घेतल्याचा आरोप मेळाव्यात केला होता. या अनुषंगाने विचारलेल्या  बंडखोरीसाठी किती पैसे मिळाले, या प्रश्नावर आ. बोरनारे म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या वेळी फॉर्म भरताना माझी ‘नंबर-१’ ची संपत्ती 18 कोटी होती. मी काय करीत आहे, याची कल्पना अविनाश गलांडे यांना होती. तरीही त्यांनी आरोप केले. राजकीय क्षेत्रात काहीतरी गडबड सुरु असल्याची संकेत मिळाल्यावर अध्यात्मिक आणि सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत काही लोकांशी मी याबाबत चर्चा केली होती. त्यांनी मला तुम्ही शिंदे यांच्याबरोबर राहिले पाहिजे, असा सल्ला मला दिला होता, आशेची बोरनारे म्हणाले.  
पंधरा दिवसांपूर्वी राज्यात काहीतरी सुरू आहे तसे मी अविनाश गलांडे व माझ्या एका जवळच्या मित्राला बोललो होतो ,असे सांगत असतानाच बंडखोरीचा ‘प्लान’ मात्र अचानक ठरल्याचे बोरनारे यांनी या क्लिपमध्ये म्हटले आहे. तरीही गलांडे असे बोलत आहेत. त्यांनी माझ्याविरुद्ध  इतक्या खालच्या पातळीवर बोलयला नको होते, असे सांगत आ. बोरनारे यांनी  काहींनी आता लगेचच गुडघ्याला बाशिंग बांधले आहे, असा टोलाही गलांडे यांना लगावला. मागील अडीच वर्षात मला फार त्रास झाला त्याकाळात शिंदेसाहेबांनी मला फार मदत केली. कार्यकर्त्यांना मी पाच-दहा लाखांची कामे दिली. मात्र त्यातील एकानेही मला एक पैसाही दिल्याचे सांगावे, असे आव्हानही बोरनारे यांनी दिले. 
आल्यावर खैरेला बघतो एका खासगी वृत्त वाहिनीवर माजी खासदार खैरे यांनी बोरनारे व त्यांचे भ्रमणध्वनीवरील संभाषण सार्वजनिक केले होते. त्याबाबतही संतप्त प्रतिक्रिया देत आ. बोरनारे यांनी खैरे यांचा एकेरी उल्लेख केला. ते म्हणाले, इतका मोठा माणूस आणि त्यांनी असे नको करायला हवे होते. खैरे किती निष्ठावंत आहे, हे मला माहित आहे. खैरेंनी हजार वेळा मला सांगितले की ‘मला दानवेने पाडले, मला दानवेने पाडले.. त्याच अनुषंगाने आमच्या दोघांच्या बोलण्यात तो उल्लेख आला होता. बाकी काही नाही. मात्र, खैरे व अंबादास दानवे यांचे अगोदरपासूनच भांडणे आहेत, असेही बोरनारे यांनी या क्लिपमध्ये सांगितले. 
 ‘कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत यांना शिंदे गटात राहण्यासाठी 50 कोटींची ऑफर’ याबाबत प्रतिक्रिया देताना आमदार उदयसिंग राजपूत यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत बोरनारे म्हणाले, ‘राजपूत काय सांगतो, ते त्याने ठरवायचं’. बाकी गुवाहाटीत सध्या नाश्ता, जेवण आणि टीव्ही अशी दिनचर्या सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.