सजग महिला संघर्ष समितीच्या शांतता फेरीने छत्रपती संभाजीनगर शहर गजबजले

  • पैठण गेट ते शहागंज मार्गावर शांतता फेरी
  • ना घोषणा, ना भाषणे, फलकांनी लक्ष वेधले
  • धार्मिक तणावाच्या पार्श्वभूमीवर आयोजन
  • सर्व स्तरातील नागरीकांचा मोठ्या संख्येत सहभाग

छत्रपती संभाजीनगर,९  एप्रिल / प्रतिनिधी :-  शहरात गेल्या आठवड्यात निर्माण झालेल्या धार्मिक तणावाच्या पार्श्वभूमीवर शांततेचा संदेश देण्यासाठी आयोजित शांतता फेरीला चांगला प्रतिसाद मिळाला. सजग महिला संघर्ष समिती आणि सजग नागरिकांच्या वतीने आयोजित फेरीमध्ये विविध क्षेत्रातील नागरीकांनी उपस्थिती लावली. कोणीही घोषणा दिल्या नाहीत की भाषणे झाली नाहीत. मोर्चेकऱ्यांच्या हातातील फलकांवरील शांततेच्या संदेशांनीच शहरवासियांचे लक्ष वेधले.

शहराचा काही भाग धार्मिक तणावाच्या घटनेने हादरला हाेता. हा तणाव लगेच आटोक्यात आला असला तरी यामुळे शहरात भितीचे वातावरण आहे. विशेषत: हातावर पोट असणारे व्यावसायिक चिंताग्रस्त आहेत. त्यांना आधार देण्यासाठी तसेच छत्रपती संभाजीनगर हे शांतताप्रिय शहर असल्याचा संदेश देण्यासाठी रविवार, 9 एप्रिल रोजी शांतता फेरीचे आयोजन करण्यात आले होते.

ना घोषणा, ना भाषणे

फेरीची सुरूवात सायंकाळी ४ वाजता पैठण गेट येथील स्वातंत्र्यसैनिक गोविंदभाई श्रॉफ यांच्या पुतळ्याला हार घालून करण्यात आली. गुलमंडी, मछली खडक, सिटी चौक असा सुमारे ३.५ किलोमीटरचा प्रवास करत ६ वाजेच्या सुमारास शहागंजच्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला हार घालून रॅलीचा समारोप झाला. रॅली दरम्यान घोषणा दिल्या नाहीत. भाषणेही झाली नाहीत. मोठ्या संख्येने नागरीक स्वत:हून सहभागी झाले. यात विद्यार्थी, ज्येष्ठ नागरीक, महिला, व्यावसायिक, माथाडी कामगार, कचरावेचक आदींची लक्षणीय संख्या होती.

फलकांनी लक्ष वेधले

शांतात फेरीत सहभागी नागरीकांनी मराठीसह हिंदी आणि उर्दूमध्ये शांततेचे संदेश असणारे फलक हातात धरले होते. हम सब एक है, हिंदू, मुस्लिम, शिख, ईसाई, बौद्ध और जैन, आपस मे है भाई बहन,  व्यावसायिकांना, भाजी विक्रेत्याला, गॅरेज वाल्याला हवी आहे शांतता, आई-वडील, आजी-आजोबांना हवी आहे शांतता, सर्व धर्माच्या नागरीकांना हवी आहे शांतता, अशा आशयाच्या फलकांनी लक्ष वेधले.

याप्रसंगी ताराबाई लड्डा, प्रा.मंगल खिवंसरा, डॉ.रश्मी बोरीकर, पद्मा तापडिया, डॉ.आरतीश्यामल जोशी, सुनीता जाधव, उषा प्रधान, मीना खंडागळे, रुपाली बाविस्कर, अभय टाकसाळ,  शकीला पठाण, सुभाष लोमटे, सतीश सुराणा, अण्णा वैद्य, प्रा.क्षमा खोब्रागडे, ज्योती पत्की, नंदिनी उपळकर, ज्योती नांदेडकर, कीर्ती शिंदे, रेखा जयस्वाल, दयानंद माने,  सुहासिनी बोरीकर, सरस्वती जाधव, डॉ. रेणू बोरीकर, कल्पना राजपूत, शालिनी बुंदेले, शकुंतला लोमटे, आशाबाई डोके, सुलभा खंदारे, ज्ञानप्रकाश मोदाणी आदींची उपस्थिती होती.