वैजापूर खरेदी -विक्री संघाला मका खरेदीच्या कमिशनची 30 लाखाची थकीत रक्कम द्या -आ. बोरणारे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

वैजापूर,​३०​ऑगस्ट  /प्रतिनिधी :- चार वर्षातील शासकीय मका खरेदीचे 30 लाखाचे थकीत कमिशनची रक्कम तालुका खरेदी विक्री संघाला देण्याची मागणी आ.रमेश पाटील बोरणारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. 
शासकीय हमीभाव केंद्रात चार वर्षापासून शेतकऱ्यांकडील मका खरेदीचे कमिशनची रक्कम न मिळाल्याने खरेदी विक्री संघाची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे. कर्मचाऱ्यांचे थकलेले मासिक वेतन तसेच नगरपालिका मालमत्ता कर, महावितरणचे विद्युत बिल, शासनाचा अकृषक कर आदींचे थकलेले देणे यामुळे वैजापूर तालुका खरेदी विक्री संघ ही तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची असलेली सहकारी संस्था पुर्णपणे कंगाल झाली आहे. याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आ.रमेश बोरनारे यांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्यांनी खरेदी विक्री संघाचे सभापती साहेबराव औताडे यांना सोबत घेऊन त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली.

वैजापूर तालुका खरेदी विक्री संघ ही तालुक्यातील एक महत्वाची सहकारी संस्था असून  शासकीय स्तरावरुन वेळीच लक्ष न दिल्यास या सहकारी संस्थेचे कामकाज बंद पडण्याच्या मार्गावर आहे. मका खरेदीतील कमिशन रक्कम संस्थेला देण्याची कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. या संस्थेच्या माध्यमातुन पीक उत्पादक शेतकऱ्यांकडुन सात बारा, ई पीक पेरा नोंद, आधार कार्ड झेरॉक्स, बॅक पास बुक झेरॉक्स, मोबाईल नंबर आदी कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर मका, तुर, मुग, उडिद, सोयाबिन आदींची शासनाच्या हमी भावानुसार खरेदी केली जाते व शेतकऱ्यांना त्यांच्या बॅक खात्यात पैसे चुकते केले जातात. मात्र, मागील दोन वर्षांपासुन हे सर्व व्यवहार पुर्णपणे बंद झाल्याने संघाची आर्थिक नाडी आवळली गेली आहे. गेल्या हंगामात संघाने 1870 रुपये प्रति क्विंटल या शासकिय हमी भावाने मका खरेदी करण्यासाठी तालुक्यातील जवळपास पाचशे शेतकऱ्यांचे अर्ज ऑनलाईन केले होते. मात्र खासगी व्यापाऱ्यांनी मकाला प्रति क्विंटल 2000 ते 2200 रुपये भाव दिल्याने मका उत्पादकांनी संघाकडे पाठ फिरवली. परिणामी शेतकऱ्यांच्या या भुमीकेमुळे संघाचे उत्पन्न कमी झाले.‌ हरभरा खरेदीही झाली नाही. त्यामुळे मागील दोन वर्षांपासुन खरेदी विक्री संघ अडचणीत सापडला आहे.

दोन वर्षांपुर्वी खरेदी केलेल्या यांचे कमीशन शासनाने अद्याप दिले नसल्याचे संघाचे चेअरमन साहेबराव औताडे यांनी सांगितले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुका खरेदी विक्री संघाने, 2017-18 च्या खरीप हंगामात संघाने शेतकऱ्यांकडुन 18 हजार 36 क्विंटल मका खरेदी करण्यात आली होती. तसेच 2019-20 घ्या रब्बी हंगामात 23 हजार 411 क्विंटल व 2020-21 घ्या खरीप हंगामात 17 हजार 984 क्विंटल मका खरेदी करण्यात आली होती. एकुण 59 हजार 431 क्विंटल मका खरेदि करण्यात आली होती. या खरेदी पोटी आठ लाख 26 हजार रुपये कमीशन शासनाकडुन संघाला मिळणे अपेक्षीत आहे. मात्र, संघाला 2017-18 पासुन मका कमीशन मिळालेले नाही. याशिवाय संघाने 2019-20 घ्या रब्बी हंगामात व2020-21 च्या खरीप हंगामात मका खरेदी केली होती. लॉकडाऊन असल्याने शासनाने मका खरेदीसाठी लागणारी बारदाने (पोते) पुरवले नव्हते. या बारदाण्यापोटी संघाला सुमारे वीस लाख रुपयांची रक्कम शासनाकडुन येणे आहे. याबाबत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनाही कळवण्यात आले आहे. संघाला उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नसल्याने संघाच्या कर्मचाऱ्यांचा पगार मागील 55 महिन्यांपासुन थकित आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. काही कर्मचाऱ्यांनी पगार मिळण्यासाठी संघाला बेमुदत उपोषण करण्याची नोटीस दिली आहे. नगरपालिकेचा मालमत्ता कर, विद्युत बील, शासनाचा अकृषिक कर, कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचि रक्कम संघाला देणे आहे. त्यामुळे रक्कम मिळण्यासाठी त्यांचा संघाकडे सतत पाठपुरावा सुरु आहे. परिणामी संघाची परिस्थिती अतिशय नाजुक झाली आहे.‌ तालुका खरेदी विक्री संघाच्या संचालक मंडळाची मुदत दोन वर्षांपुर्वीच संपली आहे. तथापि, करोनाच्या पार्श्वभुमीवर दोन वर्षांपासुन सहकारी संस्थांच्या निवडणुकांना ब्रेक लागल्याने या संस्थेची निवडणूकही झाली नसुन लवकरच संघाचे नविन संचालक मंडळ निवडण्यासाठी निवडणुक खर्चासाठी संस्थेची आर्थिक परवड झालेली आहे.
शेतक-यांचा संस्थेकडे तगादा… 
मका खरेदी व बारदाण्यापोटी शासनाकडुन संघाला येणे असलेल्या जवळपास तीस लाख रुपयांची मागणी करण्यासाठी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष साहेबराव औताडे, व्यवस्थापक अनिल चव्हाण व संचालक मंडळाने यापुर्वी माजी नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ व राज्य सहकारी पणन महासंघाचे व्यवस्थाकीय संचालक यांना पत्र पाठवले होते. मात्र कोणतीच कारवाई न झाल्यामुळे आ.रमेश बोरनारे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचे सभापती साहेबराव औताडे यांनी सांगितले.