आ.प्रशांत बंब यांच्या विरोधात विविध शिक्षक संघटनांचा वैजापुरात मोर्चा

वैजापूर,​३०​ऑगस्ट  /प्रतिनिधी :- सत्ताधारी पक्षाचे गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी  बहुतांश ठिकाणी शिक्षक मुख्यालयी वास्तव्य करत नाही असे वक्तव्य केले. या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यासाठी येथील विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी व सभासद कमालीचे एकजूट झाले होते. आ.प्रशांत बंब यांनी शिक्षकांविरोधात विधीमंडळ सभागृहात केलेल्या वक्तव्यावर सर्व शिक्षक संघटनेतील रस्त्यावर उतरुन पहिला निषेध मोर्चा सोमवारी वैजापूरात काढण्यात आला.

आठवडाभरापासून वृतवाहिनीसह सोशल मिडियावर सुरु आमदार बंब विरुद्ध शिक्षक यांच्यातील संघर्ष भडका उडाला आहे. शैक्षणिक  क्षेत्रात काम करणा-या शिक्षकांविषयी अपशब्दाचा वापणारे आ. प्रशांत बंब यांचा निषेध  करण्यासाठी शिक्षक सेना, शिक्षक संघ, मुप्टा शिक्षक संघटना, आदर्श शिक्षक समिती, शिक्षक समिती, शिक्षक भारती संघटना, प्रहार शिक्षक संघटनेतील पदाधिकारी व सभासदाची शिक्षक समन्वय कृती समिती तयार करुन त्या माध्यमातून तहसील कचेरीवर शिक्षकांनी विराट निषेध मोर्चा  काढून आमदार बंब विरोधात एकजुटीचे शक्तिप्रदर्शन केले. सोमवारी शाळा स्तरावर शैक्षणिक कामकाजाच्या वेळेत शिक्षकांनी काळया फिती लावून कर्तव्य बजावले. सांयकाळी चार वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातून आ. प्रशांत बंब यांचा निषेध लिहलेल्या टोप्या डोक्यात घालून व हातात फलक घेऊन ” आम्हाला शिकू द्या, जिल्हा परिषद शाळा टिकू द्या ” अशा जोरदार घोषणाबाजीमुळे परिसर दणाणून गेला होता. तालुक्यात मान्यताप्राप्त सहा शिक्षक संघटनेत जिल्हा परिषद, खाजगी शिक्षण संस्थेत कार्यरत एक हजार शिक्षक, शिक्षिकांनी अंत्यत शिस्तबद्ध निषेध मोर्चा काढला होता.