राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पातील कामांना वेग द्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

भूमिगत विद्युत वाहिन्या, बंधारे, निवारे प्राधान्याने उभारणार

मुंबई दि. ८ : जागतिक बँक सहाय्यित राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत ३९७.९७  कोटी रुपयांची कामे  किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये सुरू असून ही कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिल्या. नुकत्याच आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात अशा आपत्तीला सामोरे जाण्यासाठी  ही  कामे त्वरित सुरू करण्याची गरज असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

जागतिक बँकेच्या सहाय्याने राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प, राज्य प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पांतर्गत समुद्र किनारी जिल्ह्यांच्या भूमिगत विद्युत वाहिन्यांची कामे करण्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे यावर भर दिला.  रायगड जिल्ह्यातील अलिबाग शहर, रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी शहर, पालघर जिल्ह्यातील सातपाडी येथील २०३.७७ कोटींची कामे प्रगतीपथावर आहेत. सर्व नियोजित भूमिगत विद्युतवाहिनी कराराला वेळेत पुरस्कार देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. त्यामूळे अतिरिक्त भूमिगत विद्युतवाहिन्यांची कामे करण्याकरिता ३९० कोटी रुपयांना तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये मालवण ९० कोटी, अलिबाग २५ कोटी, रत्नागिरी २०० कोटी आणि सातपाडीसाठी ३५ कोटी रुपये विद्यमान कामांना वाढविण्यास तत्वत: मान्यता दिली आहे.

या प्रकल्पांतर्गतच खार प्रतिबंधक बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठीही ५५.२२ कोटी रुपये दिले आहेत. यामध्ये रायगड जिल्ह्यातील नारवेल बेनवले साठी ४४.४० कोटी, कचली पिटकरी १०.८२ कोटी देण्यात आले आहेत.आपत्तीपूर्व प्रणाली साठी (EWDS) ५३ कोटी रुपये देण्यात आले असून या प्रकल्पांतर्गत आपत्तीपूर्व प्रणालीची निविदा प्रकाशित करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे.

११ ठिकाणी निवारे उभारणार

किनारपट्टीच्या भागात ११ निवारे सध्या उभारण्यात येणार आहेत अशी माहिती मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी दिली. याशिवाय ३० निवारे आवश्यक असून त्यासाठीही तरतूद उपलब्ध करून घेण्यासाठी प्राधान्याने पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सिमेंटचा स्लॅब

नुकत्याच आलेल्या चक्रीवादळात सिमेंटच्या पत्र्यांचे नुकसान झाले व ती उडून गेली. परंतु कौलारू घरे शाबूत राहिली. आता जी घरे पूर्ववत उभी करायची आहे त्यावर पक्का सिमेंटचा स्लॅब टाकण्यात येणार आहे अशी माहितीही देण्यात आली.

वीज पडून नुकसान टाळण्यासाठी

वीज पडून होणारे नुकसान टाळण्यासाठी वारंवार वीज पडण्याचा धोका असलेल्या भागांमध्ये ‘लाइटनिंग अरेस्टर’ बसविण्याबाबत लवकरात लवकर कारवाई व्हावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले

कोकण किनारपट्टीला नेहमी चक्रीवादळांचा धोका असतो. कोकण किनारपट्टीवरील सर्व जिल्ह्यांसाठी चक्रीवादळापासून संरक्षणासाठी जे जे प्रकल्प आणता येतील ते आणले जातील. जागतिक बँकेच्या सहाय्याने सध्या सुरू असलेले विविध प्रकल्प त्वरित पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी मंत्रालयातून मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव विकास खारगे, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर, आपत्ती व्यवस्थापन संचालक अभय यावलकर व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.