वैजापुरात ब्रह्मलीन गंगागिरी महाराज यांचा सप्ताह घेण्यावरून राजकारण ; आ.बोरणारे व काँग्रेसचे बाळासाहेब संचेती यांच्याकडून सप्ताहाची मागणी

जफर ए.खान 

वैजापूर ,​७​ मे :- लाखों भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सराला बेट येथील ब्रह्मलीन गंगागिरीजी महाराज यांचा  १७६ वा अखंड हरिनाम सप्ताह यावर्षी वैजापूर शहरात घेण्यावरून दोन वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या मंडळींकडून राजकारण सुरू झाले आहे.

तालुक्यातील शिंदे गटाचे आ.रमेश पाटील बोरणारे व माजी नगराध्यक्ष साबेर खान यांनी काही दिवसांपूर्वी  पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह श्रीक्षेत्र सराला बेट येथे महंत रामगिरीजी महाराज यांची भेट घेऊन ब्रह्मलीन गंगागिरी महाराज यांचा 176 वा सप्ताह वैजापूर शहरात घेण्यासाठी त्यांच्याकडे मागणी केली. त्यानंतर काँग्रेस पक्षाचे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती  यांनी शनिवारी शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते व व्यापाऱ्यांची बैठक घेऊन सप्ताहाचे आयोजन करण्यासाठी सराला बेटचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांची 21 मे रोजी भेट घेणार असल्याचे सांगितले. आ.बोरणारे व माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती यांनी सप्ताह घेण्यासाठी वेगवेगळ्या बैठका घेतल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे.

वैजापूर येथे गंगागिरी‌ महाराज यांचा अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्याच्या अनुषंगाने येथील जैन स्थानकात शनिवारी (ता.06) सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, व्यापारी, सेवाभावी संस्था, संघटना व नागरिकांची बैठक घेण्यात आली. काँग्रेस पक्षाचे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सर्वांना सप्ताहाच्या अनुषंगाने सुचना मांडण्याची संधी देण्यात आली. यावेळी जेष्ठ नागरिक अशोक धसे, बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्वर जगताप, ज्ञानेश्वर जाधव, राजुसिंह राजपूत, दशरथ बनकर, प्रा.जवाहर कोठारी, धोंडिरामसिंह राजपूत आदींनी सुचना मांडल्या. 

सन 2000 -2001 मध्ये म्हणजेच 20 वर्षांपुर्वी माजी आमदार स्व.आर.एम.वाणी व तत्कालीन नगराध्यक्ष साबेर खान यांनी शहरातील विनायकराव पाटील महाविद्यालयाच्या मागील बाजुस असलेल्या जागेवर अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने हरिनाम सप्ताहाचे नियोजन केले होते. त्याच पद्धतीने सर्वांच्या सहभागातून हा सप्ताह देखील यशस्वी करण्याचे आवाहन बाळासाहेब संचेती यांनी केले. जवळपास सात ते आठ लाखांचा जनसमुदाय जमा होण्याची शक्यता असल्याने सर्व नियोजन काटेकोर पद्धतीने करण्यासाठी सर्वांनी‌ सहकार्य करावे. येत्या 21 मे ला सराला बेट येथे महाराजांची भेट घेण्यासाठी नागरिकांना स्वतंत्र गाड्यांची व्यवस्था करण्यात येईल. त्यासाठी प्रत्येक वार्डात युवकांची फळी काम करेल असे संचेती म्हणाले. या बैठकीला मर्चंट बॅंकेचे चेअरमन विशाल संचेती, प्रशांत पाटील सदाफळ, अकिल शेख, शोभाचंद संचेती, पंकज ठोंबरे, कैलास पवार, नगरसेवक स्वप्निल जेजुरकर, बापू सोनवणे, कैलास साखरे, काशिनाथ गायकवाड, सुरेश धुमाळ, सावनसिंह राजपूत आदींची उपस्थिती होती.