राज्यात दंगली घडवल्या जाताहेत,सरकारचेच अशा गोष्टींना प्रोत्साहन; शरद पवारांचा गंभीर आरोप

छत्रपती संभाजीनगर , ७ जून / प्रतिनिधी :- राज्यात वारंवार धार्मिक-जातीय तणावाच्या घटना घडत आहेत. कालच एक घटना संगमनेर येथे घडली तर दुसरी घटना कोल्हापूरला. या घटना जाणुनबुजून घडवल्या जात आहेत. राज्य सरकारच अशा घटनांना प्रोत्साहन देत आहे, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिंदे-फडणवीसांवर केला.

शरद पवार यांनी आज छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी संवाद साधला. यादरम्यान, संगमनेर येथे दोन गटात झालेली दगडफेक तर कोल्हापुरात औरंगजेबाच्या फोटोवरून निर्माण झालेला तणाव या दोन्ही घटनांवर शरद पवारांनी भाष्य केले.

महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र घेण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. माझे सहकारीदेखील या निवडणुका एकत्र होतील, अशी शक्यता वर्तवत आहेत. मात्र, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महाराष्ट्रात एकत्र होणार नाही, असे माझे मत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले आहे. 

देशभरात भाजपविरोधात वातावरण

शरद पवार म्हणाले, देशात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल पाहता हे निकाल विरोधी पक्षाच्या बाजूने लागत आहेत, असे एकंदरीत चित्र आहे. यावेळी शरद पवार यांनी देशातील बिगर भाजपशासित राज्यांची यादीच वाचून दाखवली. अगदी तामिळनाडूपासून केरळ, आंध्रप्रदेश, बिहार यांसह इतर अनेक राज्यात भाजपची सत्ता नाही. कर्नाटकमध्येदेखील भाजपचा पराभव झाला आहे. देशभर भाजप विरोधात वातावरण आहे. बदलाला सुरूवात झाली आहे.लोकांनी विधानसभेत वेगळा कौल द्यायला सुरूवात केली आहे. संबंध देशभरात हेच चित्र आहे.

सत्ताधारी पक्षाची मानसिकता पेशवाई

बाजीराव पेशवे यांनी जंजिरा किल्ला जिंकला. त्याचा इतिहास विसरता येणार नाही, असे वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी एका जाहीर कार्यक्रमात केले होते. त्यावर शरद पवारांनी टीका केली आहे. सत्ताधाऱ्यांची मानसिकता ही पेशव्यांची असून कुलगुरूंच्या निवडीची यादी पाहिल्यास ते लक्षात येते. यापूर्वीचे राज्यपाल याबाबत जास्त बोलत होते. आताचे राज्यपाल कसे आहेत? हे स्पष्ट होऊ द्यावे लागेल, असा टोला शरद पवारांनी लगावला.

शरद पवार नेमके काय म्हणाले … ​

राज्यात संगमनेर व कोल्हापूर येथे पुन्हा सामाजिक तणावाच्या घटना घडल्या. कोल्हापूर येथील आंदोलनाची बातमी टिव्हीवर पाहिली. कोणीतरी मोबाईलवर मेसेज पाठवतो. त्यावरुन लगेच रस्त्यावर उतरुन अशा घटनेला धार्मिक स्वरुप देणे योग्य नाही. सत्ताधाऱ्यांनी अशा गोष्टीला प्रोत्साहित करणे योग्य नाही. राज्यात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणे ही राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे. पण जर राज्य सरकारच या प्रकरणात लोकांना उचकवू लागले आणि दोन समाजात, दोन जातींमध्ये कटुता निर्माण करू लागले तर हे काही चांगले लक्षण नाही.

गेल्या काही दिवसांत दंगलीसदृश्य घटना घडल्या. मात्र, या घटना त्या-त्या परिसरातच मर्यादित राहिल्या. ही चांगली गोष्ट आहे. मात्र, हे जाणूनबुजून घडवले जात आहे. उदाहरणच घ्यायचे तर छ. संभाजीनगरमध्ये कोणी तरी औरंगजेबाचा फोटो दाखवला. तर, त्यावरून पुण्यात आंदोलन करायचे काय कारण आहे?

ओडिशा आणि काही राज्यात चर्चवर हल्ले केले जात आहेत. ख्रिश्चन समाज हा शांतताप्रिय आहे. कोणाची काही चूक असेल तर सरकारने पोलिस कारवाई करावी. मात्र तसे न करता चर्चवर हल्ले केले जात आहेत. हे एकट्या-दुकट्याचे काम नाही. ही एक विशिष्ट विचारसरणी आहे. ही विचारधारा समाजाच्या हिताची नाही.