आमदारांच्या निलंबनाविरोधात न्यायालयात जाणार :चंद्रकांत पाटील

भाजपचं अभिरुप अधिवेशन

आमदारांनी शिवीगाळ केली नाही

मुंबई,६जुलै /प्रतिनिधी :-
दोन दिवसीय विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा तालिका अध्यक्षांना शिवीगाळ केल्याच्या सबबीखाली भाजपाच्या 12 सदस्यांचे निलंबन करण्यात आले. आता या 12 आमदारांच्या निलंबनाविरोधात न्यायालयात जाणार असल्याची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी दिली आहे.

पाटील म्हणाले की, आमच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्षांना शिवी दिलेली नाही. भास्कर जाधव यांनीच शिवी दिली, पण कारवाई आमच्या आमदारांवर करण्यात आली. तसेच आमदारांना निलंबित केल्याच्या विरोधात आम्ही न्यायालयात जाऊन दाद मागणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटलांनी दिली आहे. तसेच खोटे कसे बोलायचे हे या सरकारकडूनच शिकायला हवे. असा टोलाही पाटील यांनी लगावला.
 
 
भाजपा हा काही साधासुधा पक्ष नाही, 106 आमदार निवडून आलेला पक्ष आहे. आज तुम्ही 106 आमदार असलेल्या पक्षाचा आवाज दडपला आहे, या विरोधात आम्ही आवाज उठवणार आहोत. राज्यपालांकडे निलंबित केलेले 12 आमदार गेले होते, आता आम्ही उच्ज न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार आहोत. हा अन्याय आहे. अशाप्रकारचे सगळे निर्णय गोळा केल्यानंतर असे लक्षात येते की, आपल्याला न्यायालयामध्ये न्याय मिळेल, असे त्यांनी सांगितले.

May be an image of 15 people, people sitting and people standing
भाजपचं अभिरुप अधिवेशन

बारा आमदारांच्या निलंबनामुळे आक्रमक झालेल्या भाजपने अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेच्या कामकाजात सहभागी न होता विधानभवनाच्या बाहेर अभिरुप अधिवेशन भरवलं. भाजपने प्रतिविधानसभा भरवत सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला.

भाजपने आमदार कालिदास कोळंबकर यांना प्रतिविधानसभेच्या अध्यक्षपदी बसवलं. विधानभवनाच्या मुख्य पायऱ्यांवरच विरोधक माइक स्पीकर लावून सरकार विरोधात भाषण करू लागले. एकीकडे विधानसभेचं कामकाज सभागृहात सुरू होतं तर दुसरीकडे बाहेर विरोधकांनी आपलं कामकाज सुरू केलं होतं. ही बाब महाविकास आघाडीतील काही सदस्यांनी विधानसभेत उपस्थित केल्यानंतर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी विधिमंडळ परिसरात स्पीकर, माईक लावायला परवानगी कोणी दिली, असा सवाल उपस्थित केला.

तालिका अध्यक्षांच्या आदेशानुसार सुरक्षा रक्षकांकडून प्रतिविधानसभेतील स्पीकर काढून घेण्यात आले. यानंतर विरोधकांनी पायऱ्यांवरून आपला मोर्चा मीडियासाठी असलेल्या मंडपात वळवला. तिथे विरोधकांनी सरकारवर टीका करणारी भाषणे केली. महाराष्ट्राच्या विधीमंडळात सत्ताधाऱ्यांनी काळा अध्याय लिहीला आहे, ही महाराष्ट्रातली आणीबाणी आहे,” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी या अभिरुपी अधिवेशनात केली.