आपल्या मर्यादेत राहा!-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव यांना थेट इशारा

मुंबई ,१९ जून /प्रतिनिधी :-खोके कुठे गेले हे जनतेसमोर आल्याशिवाय राहणार नाही. बाळासाहेबांची पुण्याई आहे. पण तुम्ही आपल्या मर्यादेत राहा, अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे. शिवसेना वर्धापन दिनानिमित्त आज शिंदे गटाकडून गोरेगाव येथील नेस्को संकुलातील कार्यक्रमात उपस्थित असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी जवळपास तासभराच्या भाषणात ठाकरे गटावर जोरदार प्रहार केला. एक नोटीस आली तर मोदी शाह यांच्याकडे धावत गेले असल्याचा टोलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी लगावला.

मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळावर टीका केली. अडीच वर्षाच्या काळात मागील मुख्यमंत्र्यांनी जेवढ्या सह्या केल्या नसतील तेवढ्या सह्या मी मागील ११ महिन्यात केल्या आहेत. मागच्या मुख्यमंत्र्यांकडे पेनच नव्हता. माझ्याकडे दोन पेन आहेत. मी गाडीतून फाईल घेऊन जातो, त्यात सह्या करतो. रस्त्यावर, वेळ मिळेल तशा सह्या करतो आणि फाईल मार्गी लावतो असेही त्यांनी म्हटले.

शिवसेनेसाठी आम्ही खस्ता खाल्ल्या, तुम्ही काय केले? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना थेट सवाल!

मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या कामाची माहिती देत शिवसेनेसाठी आम्ही खस्ता खाल्ल्याचे सांगितले. तसेच, मुख्यमंत्री असताना केवळ २ दिवसच तुम्ही घराबाहेर पडले, असे म्हणत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

मुख्यमंत्री शिंदे यांनी कार्यकर्ता ते शिवसेना मंत्री होताना आपण आजपर्यंत अनेक केसेस अंगावर घेतल्याची आठवण सांगितली. बाळासाहेबांच्या विचारांनी पेटून आमच्यासारख्या अनेक शिवसैनिकांनी शिवसेना वाढवली, असे सांगताना एकनाथ शिंदेंनी काही भावनिक प्रसंग सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या आयुष्यातील काही प्रसंग सांगत शिवसेनेसाठी आपण सर्वस्व वाहून घेतल्याचं म्हटलं. मी वयाच्या २२ व्या वर्षी कर्नाटकच्या तुरुंगात ४० होतो. माझा मुलगा श्रीकांत डॉक्टर झाला, एमडी झाला, सर्जन झाला. श्रीकांतने माझ्याकडे दवाखाना टाकून देण्याची मागणी केली. मात्र, मी त्याला दवाखाना टाकून देऊ शकलो नाही. कारण, दवाखाना टाकायचा म्हटलं की आली निवडणूक.. मग निघालो निवडणुकांसाठी, असं सांगत कुटुंबाला वेळ देऊ शकलो नाही, पण शिवसेनेलाच कुटुंब मानलं, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

एकनाथ शिंदेंनी यावेळी एक भावनिक प्रसंग सांगितला. माझी आई रुग्णालयात उपचार घेत होती. त्यावेळी, मी लोकसभा निवडणुकांसाठी प्रचारात व्यस्त होतो. तेवढ्यात मला डॉक्टरांचा फोन आला, डॉक्टरांचा फोन येताच मनात पाल चुकचुकली. पण, मला सांगितलं आपल्याल इथं इथं सभा घ्यायच्या आहेत, त्यावेळी मी हो म्हणत या सभा घेऊ म्हटलं, आधी ते काम केलं. त्यानंतर, दवाखान्यात जाऊन आईचं अंत्यदर्शन घेतलं, असा भावनिक प्रसंग एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात सांगितला.

एकनाथ शिंदे म्हणाले की, आयुष्यात दु:खाचा डोंगर कोसळला तेव्हा बाळासाहेबांच्या, आनंद दिघेंच्या आशीर्वादाने आज एकनाथ शिंदे उभा आहे. तुला लाखोंचे अश्रू पुसायचे आहेत हे शब्द दिघेसाहेबांचे आहेत. हे आजही मला आठवतायेत. हा महाराष्ट्र माझा परिवार आहे. त्यामुळे मला जास्तवेळ काम करावे लागते असं त्यांनी सांगितले.