१ नोव्हेंबरपर्यंत आरोप सिद्ध करा ; बच्चू कडू आणि रवी राणा वाद शिगेला

मुंबई ,२७ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- राज्यातील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडावेळी आमदार बच्चू कडू यांनी त्यांना समर्थन दिलं होते. त्यावर गुवाहाटीला जाऊन पैसे घेतल्याचा आरोप अपक्ष आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर केला होता. या आरोपानंतर बच्चू कडू अत्यंत दुखावले गेल्याचं पाहायला मिळत आहेत. तसेच, त्यांनी रवी राणांना १ नोव्हेंबरपर्यंत आरोप सिद्ध करण्याचे आव्हान देखील दिलं आहे.

बच्चू कडू यांनी बुधवारी ( २६ ऑक्टोंबर ) नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. बच्चू कडू म्हणाले, “रवी राणा यांची एकट्याची बोलण्याची हिंमत नाही, ते कोणाच्या भरवशावर बोलतात हे तपासलं पाहिजे. राणांनी केलेल्या आरोपांमुळे मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह यांनी आमदारांना गुवाहाटीला नेत पैसे दिले, असा प्रश्न उभा राहतो.”

रवी राणांनी केलेल्या आरोपांनंतर बच्चू कडू यांनी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे. माझ्या अस्तित्वावर बोट ठेवाल तर बोटं छाटू असा थेट निर्वाणीचा इशाराच बच्चू कडूंनी दिला. राणांनी 1 नोव्हेंबरपर्यंत पुरावे सादर करावे अन्यथा आपण मोठी घोषणा करणार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. रवी राणा यांनी थेट फडणवीसांचं नाव घेतलं अन् उत्तर दिलंय. असल्या धमक्यांना मी घाबरत नाही. देवेंद्र फडणवीस आमचे नेते आहे. त्यांनी मला बोलावलं तर मी जरूर जाईल, असं राणा म्हणालेत.