वादाऐवजी संवादावर भर देणारा, समाजाचा चोहोबाजूंनी रक्षण करणारा व्यक्तीच खरा नेता – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोल्हापूर येथे सुरु करण्यात आलेल्या पहिल्या सारथी उपकेंद्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन

दीन दुबळ्यांना ताकद देण्याच्या कामात कोणतीही अडचण येऊ दिली जाणार नाही

कोल्हापूर, २६ जून /प्रतिनिधी :- संघर्ष करीत असताना संघर्ष कधी करायचा आणि संवाद कधी करायचा हे ज्याला कळते त्याचबरोबर जो वादा ऐवजी संवादावर भर देतो आणि समाजाचं चोहोबाजुनी रक्षण करतो तोच खरा नेता होवू शकतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

राजर्षी शाहू महाराज जयंती दिनाचे औचित्य साधून कोल्हापूर येथे सुरु करण्यात आलेल्या पहिल्या छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव संस्थेच्या (सारथी) उपकेंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते ऑनलाईन पद्धतीने झाले त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संभाजीराजे छत्रपती, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील आदी प्रत्यक्ष उपस्थित होते तर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराज देसाई, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, खासदार धैर्यशील माने, मुख्य सचिव सिताराम कुंटे, अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रबर्ती हे ऑनलाईन पध्दतीने उपस्थित होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, शाहू जयंतीदिनी हे उपकेंद्र सुरु होत आहे याचा मनस्वी आनंद आहे. गेल्या काही दिवसापासून गाजत असलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न खासदार संभाजीराजेने संयमाने हातळल्याबद्दल राजेंना धन्यवाद. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आपले सरकार कटिबद्ध आहे. सरकार म्हणून जे जे करता येणे शक्य आहे ते सर्व करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. आरक्षणाच्या अनुषंगाने कायद्याची लढाई शासनाने सोडली नसल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, दिन दुबळ्यांना ताकद देण्याचे काम महाविकास आघाडी शासन करीत आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी बोलताना सांगितले की, मराठा समाजाला न्याय देण्याची शासनाची भूमिका असून समाजाच्या इतर मागण्याबाबतही सरकार संवेदनशील आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक आहे. मराठा समाजाने आरक्षणाबाबत समजुतदारपणाची भूमिका घेतल्याबद्दल त्यांनी समाजाला धन्यवाद दिले. तर पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, मराठा समाजाला न्याय देण्याची सरकारची भूमिका असून सरकार या समाजाला न्याय देईल. येत्या सोमवारपासून येथील उपकेंद्र सुरु होण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आल्याचेही ते म्हणाले.

तत्पूर्वी खासदार संभाजीराजेंनी राज्यातील पहिले उपकेंद्र कोल्हापूरात सुरु केल्याबद्दल सरकारचे आभार मानुन या उपकेंद्रसाठी शासनाने किमान 5 एकरापेक्षा अधिक जमीन द्यावी अशी मागणी केली तर अध्यक्षीय भाषणात श्रीमंत छत्रपती शाहू महाराज म्हणाले, या उपकेंद्राच्या माध्यमातून समाजाला मार्गदर्शन मिळेल. शासनाने समाजाच्या इतर प्रश्नांबाबतही लवकरात लवकर निर्णय घेवून समाजाला न्याय देण्याचे कार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

राजाराम महाविद्यालयातील प्री आयएएस ट्रेनिंग सेंटरच्या परिसरातील कमवा आणि शिक्षा योजनेच्या इमारतीत हे उपकेंद्र सुरु होणार आहे. या उपकेंद्रामुळे विद्यार्थ्यांची, संशोधकांची, अभ्यासकांची चांगली सोय होणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सारथीचे अध्यक्ष अजित निंबाळकर तर आभार सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी मानले.