पेट्रोल व खतांच्या  किंमत वाढीविरोधात राष्ट्रवादीचे जिल्हानिहाय आंदोलन -प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील 

मुंबई ,१६मे /प्रतिनिधी:   शंभर रुपयांच्यावर पेट्रोलचे दर आणि  खतांची किंमत प्रचंड प्रमाणात वाढण्याच्या निषेध म्हणून  याविरोधात  राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन हाती घेणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष   जयंत पाटील यांनी जाहीर केले आहे.
भारतात पेट्रोलच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. शंभर रुपयांच्यावर पेट्रोलचे दर गेलेले आहेत. केंद्र सरकारने आज सामान्यांना दुसरा धक्का दिला आहे. खतांच्या किमती भरमसाठ वाढविण्याचे काम भारत सरकारने केले आहे. १०.२६.२६ ची किंमती ६०० रुपयांनी वाढली आहे. डिएपीची किंमत जवळपास ७१५ रुपयांनी वाढली आहे. जो डिएपी ११८५ रुपयाला होता, तो आता १९०० रुपयांना मिळणार आहे. १०.२६.२६ चे पन्नास किलोंचे पोते ११७५ रुपयांचे होते ते आता १७७५ रुपयांना मिळणार आहे. यासोबत पोटॅशच्याही किमती वाढविल्या आहेत. देशातल्या खतांची किंमत प्रचंड प्रमाणात वाढविण्याचे पाप भाजप सरकारने केले असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे या दरवाढीचा निषेध म्हणून याविरोधात राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन हाती घेणार असल्याचे जयंतराव पाटील यांनी जाहीर केले आहे.कोणत्याही परिस्थितीमध्ये ही दरवाढ कमी केली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. कोरोनामुळे देशातील शेतकरी आधीच अडचणीत असताना खतांची दरवाढ करून भाजपशासित केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. देशभरातील इतर शेतकरी देखील मोठ्या संख्येने केंद्र सरकारविरोधात आवाज उचलतील अशी आम्हाला आशा आहे, असे प्रदेशाध्यक्षांनी सांगितले.