राजीव सातव यांना सर्वपक्षीय नेत्यांकडून श्रद्धांजली; पंतप्रधान,मुख्यमंत्री यांनी व्यक्त केलं दु:ख

हिंगोली ,१६ मे /प्रतिनिधी :

कॉंग्रेसचे युवा नेते आणि खासदार राजीव सातव यांचे कोरोनाच्या संसर्गामुळे निधन झाले आहे. अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. आज पुण्यात त्यांची प्राणज्योत मालवली. कॉंग्रेसचा आणि देशातील एक उमदा तरुण नेता हरवल्याची खंत राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दुःख  

राजीव सातव यांच्या निधनानंतर अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विट करत राजीव सातव यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.

“संसदेतील माझे मित्र राजीव सातव जी यांच्या निधनाने मी दु:खी आहे. ते अधिक क्षमता असलेले भविष्यातील आगामी नेते होते. त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि समर्थकांबद्दल मला दु:ख आहे. ओम शांती”, असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

उमद्या नेतृत्वाचे अकाली जाणे क्लेशदायक असल्याची भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे   

राजकारणातील संयमी, उमद्या नेतृत्वाचे अकाली जाणे क्लेशदायक असल्याची भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार राजीव सातव यांच्या निधनाबद्दल व्यक्त केली आहे.

राजीव सातव यांनी आपल्या प्रांजळ स्वभावाने पक्ष, राजकारणाच्या पलीकडे जाऊन मित्र जोडले होते. संसदीय प्रणालीवर दृढ विश्वास असणारे आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून त्यांचा उल्लेख केला जात असे. त्यांचे अकाली जाणे हे त्यांच्या कुटुंबावर, पक्षावर मोठा आघात आहे, तो सहन करण्याची शक्ती सातव कुटुंबियांना मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना. खासदार राजीव सातव यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

‘राजीव सातव यांच्या निधनाच्या वृत्ताने व्यथित’ : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

तरुण व तडफदार खासदार राजीव सातव यांच्या अकाली निधनाचे वृत्त समजून व्यथित झालो. श्री.सातव कोरोनावर मात करून लवकरच बाहेर येतील असे वाटत असतानाच ही दु:खद बातमी आली. श्री.सातव यांचेकडे नेतृत्वगुण व संघटन कौशल्य होते. त्यांचा जनसंपर्कही व्यापक होता. दुर्दैवाने काळाने एक मोठी क्षमता असलेला नेता आपल्यातून हिरावून नेला आहे. त्यांच्या आत्म्यास प्रभुचरणांजवळ स्थान मिळो ही प्रार्थना करतो व आपल्या शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबियांना व चाहत्यांना कळवतो, असे राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी आपल्या शोकसंदेशामध्ये म्हटले आहे.

सातव हे भारतीय राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा होते-अजित पवार 

काँग्रेसचे युवा नेते, खासदार राजीव सातव यांच्या निधनाने महाराष्ट्राने, देशाने एक अभ्यासू, कार्यकुशल, आश्वासक नेतृत्व गमावले आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांचे  मित्र आणि विश्वासू सहकारी असलेल्या राजीव सातव यांचे सर्व पक्षांच्या नेत्यांशी, कार्यकर्त्यांशी जवळिकीचे, मित्रत्वाचे, सौहार्दाचे संबंध होते. राजीव सातव हे भारतीय राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा होते. त्यांच्या निधनाने जगन्मित्र हरपला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

आज सकाळी सकाळीच *राजीव सातव* यांच्या निधनाची आलेली बातमी दुःखद आहे. आमदार, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य असा जबरदस्त प्रवास त्यांनी अत्यंत कमी वयात केला. गुजरात काँग्रेसचे प्रभारी म्हणून त्यांनी अत्यंत नेत्रदीपक असे काम केले. काँग्रेसचे भविष्यातील एक आश्वासक नेतृत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहत होतो. सातव यांचे निधन ही काँग्रेसची मोठी हानी आहे. सातव परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. *श्री.राजीव सातव* यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण

आमचे सहकारी व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव खा. राजीव सातव यांचे अकाली निधन अतिशय वेदनादायी असून, नियतीने एका प्रतिभाशाली उमद्या नेतृत्वाला हिरावून घेतले आहे.जिल्हा पातळीपासून राजकीय प्रवास सुरू करून विलक्षण जिद्द व कर्तबगारीच्या बळावर अतिशय कमी वेळेत राष्ट्रीय पातळीवर आपली ओळख निर्माण करणारे खा. राजीव सातव यांच्याबद्दल संपूर्ण देशात कुतुहल होते. महाराष्ट्रासाठी ते एक अभिमान होते. पुढील काळात देश व काँग्रेस पक्षासाठी त्यांच्याकडून मोठे योगदान अपेक्षित केले जात होते. खा. राजीव सातव यांचे निधन काँग्रेस पक्षासाठी मोठी हानी आहे. विशेषतः महाराष्ट्र आणि मराठवाड्याचे मोठे नुकसान झाले आहे. संपूर्ण देशातील त्यांचा मित्र परिवार आणि चाहत्यांच्या मनात त्यांच्या स्मृती चिरंतन राहतील. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व सातव कुटुंबियाला हे अपरिमित दुःख सहन करण्याचे सामर्थ्य मिळो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

“काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक आणि दुःखद आहे. तरुण, आश्वासक आणि अभ्यासू नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. या कठीण प्रसंगी हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना प्राप्त होवो, ही प्रार्थना करतो! ॐ शान्ति” असे फडणवीस यांनी म्हटले आहे. 

काँग्रेस विचारांवर प्रगाढ श्रद्धा व उज्ज्वल भविष्य असलेला समर्पित नेता गमावला!-बाळासाहेब थोरात 

काँग्रेस पक्षाचे युवा नेते, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य, खासदार राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त अंतःकरण पिळवटून टाकणारे आहे. तरुण वयातच देशपातळीवर नावलौकिक कमावलेला, लोकशाहीवर, काँग्रेस विचारांवर प्रगाढ श्रद्धा व उज्ज्वल भविष्य असलेला समर्पित नेता आम्ही गमावला आहे, अशा शब्दांत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

खासदार राजीव सातव यांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त करून श्री.थोरात म्हणाले की, खासदार राजीव सातव यांचे काम मी जवळून पाहिले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेपासून त्यांनी राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. पंचायत समिती सदस्य ते खासदार प्रत्येक जबाबदारी पार पाडत असताना गरीब, कष्टकरी जनता, तरूण व  शेतकऱ्यांचे प्रश्न ते अत्यंत तळमळीने मांडत असत. आपल्या कामाच्या ताकदीवर ते कमी वयात देश पातळीवरच्या राजकारणात पोहोचले. आमदार, खासदार म्हणून त्यांनी आपल्या कामाची वेगळी ओळख निर्माण केली होती. सामाजिक, राजकीय प्रश्नांची त्यांना उत्तम जाण होती. विविध विषयांचा अभ्यास, संघटन कौशल्य, अभ्यासू, मनमिळावू, सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा त्यांचा स्वभाव होता.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष व त्यानंतर अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांनी तरुणांचे मोठे संघटन उभे केले. खासदार म्हणून संसदेत काँग्रेस पक्षाची भूमिका ते भक्कमपणे मांडत असत. कृषी कायद्याला तीव्र विरोध करत राज्यसभेत त्यांनी पक्षाची बाजू समर्थपणे मांडली. त्यांना तीनवेळा संसदरत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले होते. संविधान, लोकशाही व काँग्रेस विचारांसाठी संघर्ष करण्याची त्यांची तयारी असायची. आपल्या कर्तृत्वाच्या बळावर काँग्रेस पक्षाची सर्वोच्च समिती असणाऱ्‍या काँग्रेस कार्यसमितीच्या सदस्यपदी त्यांची निवड करण्यात आली होती. राजीव सातव यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबाची व काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली आहे. आम्ही सर्व या कठीण प्रसंगी सातव कुटुंबियांच्या सोबत आहोत. त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याचे बळ मिळो, अशी ईश्वराकडे मी प्रार्थना करतो.

खासदार राजीव सातव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून, राजीव तुमची मेहनत, संघर्ष कायम आठवणीत राहील, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

छगन भुजबळ

काँग्रेसचे युवा नेते राज्यसभा सदस्य खा.राजीव सातव यांचे दुःखद निधन झाले. सातव यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, मनरेगा, दुष्काळ, रेल्वे यासारख्या अनेक मुद्द्यांवर संसदेत आवाज उठवला. त्यांच्या संसदेतील उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांना सलग चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. काँग्रेस पक्षातील अतिशय निष्ठावान आणि राहुल गांधी यांचे अतिशय जवळचे सहकारी असलेले सातव यांनी भारतीय युवा काँग्रेसचं अध्यक्षपदही भूषवलं होतं. सातव हे काँग्रेस पक्षातील एक उमदं युवा नेतृत्व होतं. त्यांचे आणि आमचे कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे संबंध होते. राज्यातील आणि देशातील तरुणांमध्ये अतिशय लोकप्रिय असलेल्या सातव यांच्या निधनामुळे देशाने एक युवा संसदरत्न व समाजभुषण व्यक्ती गमावला आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राचा केंद्रातील दुवा हरपला आहे. सातव कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून मी व माझे कुटुंबीय सातव कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो.दिवंगत खासदार राजीव सातव यांना भावपूर्ण श्रद्धांजली !
जयंत पाटील

सकाळी सकाळीच राजीव सातव यांच्या निधनाची आलेली बातमी दुःखद आहे. आमदार, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य असा जबरदस्त प्रवास त्यांनी अत्यंत कमी वयात केला. गुजरात काँग्रेसचे प्रभारी म्हणून त्यांनी अत्यंत नेत्रदीपक असे काम केले. काँग्रेसचे भविष्यातील एक आश्वासक नेतृत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहत होतो. सातव यांचे निधन ही काँग्रेसची मोठी हानी आहे. सातव परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. श्री. राजीव सातव यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 
अमित देशमुख
राज्यसभेतील काँग्रेस पक्षाचे खासदार, युवा सहकारी, राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आणि अतिशय दुःखदायी आहे. पक्षपातळीवर अनेक जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पडणाऱ्या या नेतृत्वाची रुग्णालयातील झुंज दुर्दैवाने अयशस्वी ठरली, त्यांचा आकस्मित जाण्यामुळे पक्षात न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे, पक्षासाठी त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील, त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना

युवा नेतृत्वास देश मुकला – शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड

​आपल्या कार्याने युवकांसाठी आदर्श ठरलेल्या खासदार राजीव सातव यांचा निधनाने युवा नेतृत्वास देश मुकला आहे, अशा शब्दात शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत.

आपल्या शोक संदेशात प्रा.गायकवाड म्हणतात, खासदार राजीव सातव यांनी आपल्या सामाजिक कार्याची सुरूवात मराठवाडा येथून केली. हिंगोली मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडून गेले होते. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी पंचायत समिती सदस्य, जिल्हापरिषद सदस्य, म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. २००९ मध्ये ते पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते. सन २०१४ च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत ते लोकसभेवर निवडून गेले होते.  सन २००८-२०१० या कालावधीत महाराष्ट्र युवक काँग्रेस अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेल्या उत्तम कामगिरीची दखल राष्ट्रीय स्तरावर घेतली गेली. त्यांना पक्षाने युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून २०१० ते २०१४ या कालावधीत काम करण्याची संधी दिली. गुजरात निवडणुकीतही भारतीय काँग्रेस पक्षाच्यावतीने त्यांच्यावर महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली होती.खासदार राजीव सातव यांचे सर्व पक्षातील लोकांशी मित्रत्वाचे संबंध होते. दूरदृष्टी असलेले एक अजातशत्रू , सात्विक , सोज्वळ  व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. एका कर्तृत्ववान युवा नेत्याच्या अकाली निधनाने भारतीय राजकारणाची व सामाजिक क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे, असेही प्रा. वर्षा गायकवाड यांनी आपल्या शोकसंदेशात  म्हटले आहे.

गोपीनाथ मुंडे साहेबांचा लाडका युवा नेता हरपला​-पंकजा मुंडे ​

 भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील दुःख व्यक्त केले असून, “मुंडे साहेबांचा लाडका युवा नेता हरपला.” अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.पंकजा मुंडेंनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर करूनही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “सामान्य समाजासाठी धडपडणारा, एक तरूण उमदा, युवा नेता राजीव सातवच्या रूपाने आज आपण गमावलेला आहे. ज्यांनी आपलं आयुष्य कष्टामध्ये घालवून.. अनेक लोकांचे हात एका जीवनाला लागतात जेव्हा तो एका उंचीवर पोहचत असतो आणि तो त्या उंचीवरून अनेक जीवनांना स्पर्ष करत असतो. अशा प्रवासाचं एक उदाहरण असलेल्या राजीव सातवचा घास या क्रूर करोनाने घेतला. मी मनापासून दुःख व्यक्त करते. सातव परिवाराच्या दुःखात समस्त मुंडे परिवार सहभागी आहे.” असं पंकजा मुंडेंनी म्हटलं आहे.

सत्यजित तांबे

राजीवभाऊ, आपण कायम संघर्ष करुन विजय मिळवला, ह्या आजाराच्या संकटावरही आपण मात करुन शेवटच्या क्षणी तरी बाहेर याल हीच माझ्यासह अनेकांची अपेक्षा होती. दुर्देवाने आम्ही सगळेच हारलो. हजारो युवकांचे प्रेरणास्थान,मार्गदर्शक हरपला. मला प्रत्येक गोष्टीसाठी लढा द्यायला नेहमी तुम्हीच शिकवलं होतं , सामर्थ्यवान होण्यासाठी देखील मार्गदर्शन तुम्हीच केले होते. नियती क्रुर आहे. नियतीच्या ह्या चुकीसाठी कधीच माफी नाही.
आमदार अंबादास दानवे

विश्वास बसत नाहिये, मराठवाड्यातील उदयोन्मुख नेतृत्व खासदार राजीव सातव जी यांना महाराष्ट्र आज मुकलाय! सातव परीवाराच्या दुःखा आम्ही सहभागी आहोत. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, शिवसेना औरंगाबादच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली!
एस एम देशमुख

राजीवजी, एवढ्या लवकर जायला नको होतं, तुमची देशाला, महाराष्ट्राला गरज होती..राजकारणात माझे कमी मित्र आहेत.. राजीव सातव त्यातले एक होते.. त्यामुळे माझे व्यक्तीगत मोठे नुकसान झाले … पत्रकारांच्या चळवळीला त्यांचा नेहमीच पाठिंबा आणि सहकार्य होते.. काही दिवसांपुर्वीच कळमनुरीत त्यांची भेट झाली तेव्हा पत्रकार संरक्षण कायदा देशपातळीवर झाला पाहिजे आणि त्यासाठी दोन्ही सभागृहात मी आणि माझे सहकारी हा विषय उपस्थित करू असे त्यांनी सांगितले होते… त्यांच्या निधनाने मी एक चांगला मित्र गमविला आहे..माझ्या व्यक्तीगत जीवनात आणि महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी कधीच भरून येणार नाही.. भावपूर्ण श्रद्धांजली

उमद्या नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला : खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर

  खा.राजीव सातव यांच्या निधनाची बातमी कळताच धक्काच बसला . हिंगोली सारख्या मागास भागातून स्वबळावर नेतृत्व उभे करत ते महाराष्ट्रसह दिल्लीतही आपली छाप टाकत  काँग्रेससह महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत होते. राज्यसभेतही त्यांनी वेळोवेळी सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत उपस्थित केलेली चर्चा लक्षवेधी ठरत होती. ग्रामीण मातीतील माणूस विकासाच्या मुख्य प्रवाहात आला पाहिजे यासाठीही त्यांची धडपड होती. खा. सातव यांचे नेतृत्व  सर्वसामान्यांसाठी एक आधारवड होते. अभ्यासू , संयमी, विश्वासू , मनमिळवू , शहरी आणि ग्रामीन भागाच्या विकसाची जाणीव असणारे तरुण नेतृत्व म्हणूनही खा. सातव यांची ओळख होती. मराठवाड्यातील राजकारणात स्वता:ची वेगळी ओळखही त्यानी निर्माण केली होती. अत्यंत उमेदीच्या काळात कोरोना ने खासदार राजीव सातव यांचा घात केला. खा. राजीव सातव यांच्या निधनाने  महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.  दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या  आत्म्यास ईश्वर शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना सावरण्याचे बळ देवो.