मला अटक झाल्यास लाखो मराठा उपोषणाला बसतील -जरांगे

छत्रपती संभाजीनगर,१ मार्च / प्रतिनिधी :- जर आपल्याला अटक करण्यात आली तर कोट्यवधी मराठा उपोषणाला बसतील असा दावा मराठा आंदोलन कार्यकर्ते मनोज जरांगे यांनी गुरुवारी येथे केला. विशेष वर्गवारीनुसार मराठ्यांना १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय राज्य विधीमंडळात घेण्यात आला, त्याला आपला विरोध असल्याचा पुनरुच्चार जरांगे यांनी केला.

मराठा समाजाला जे १० टक्के आरक्षण देण्यात आले आहे, त्यामध्ये सामाजिक आर्थिक मागासवर्गाला ज्या सवलती देण्यात आल्या आहेत. त्याचा अंतर्भाव केल्यास हे १० टक्के आरक्षण आम्हाला स्वीकारार्ह असेल, असेही जरांगे म्हणाले.

मराठा समाज आपल्या हक्कांसाठी लढा देत असल्याचेही जरांगे यांनी येथील एका खासगी रुग्णालयात वार्ताहरांना सांगितले. सगेसोयरे मसुदा अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याची सरकारकडे अद्यापही संधी आहे, समाज त्याचे स्वागतच करेल, असेही जरांगे म्हणाले.

पात्र कुणबी (इतर मागासवर्ग) मराठ्यांना प्रमाणपत्रे देण्याबाबतची अधिसूचना जानेवारी महिन्यातच जारी करण्यात आली.

आपल्याला कारागृहात डांबण्यात आले तरीही मराठा समाज आणि आपण स्वत: ज्यां मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत त्यांच्या नातेवाईकांनाही आरक्षण देण्याची मागणी सोडणार नाही. आपल्याला एक रुपयाचाही लोभ नाही, त्यांनी मला खुशाल अटक करावी, ते ज्या मार्गावरून आपल्याला कारागृहाकडे नेतील त्या मार्गावर मराठा समाजातील कोट्यवधी लोक रस्त्यावर उपोषणाला बसलेले दिसतील, असेही जरांगे म्हणाले.