आधी रक्तदान करा आणि त्यानंतर कोरोना प्रतिबंधात्मक लस घ्या

मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांचे आवाहन

मुंबई,२७एप्रिल /प्रतिनिधी  :   कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेचा महत्वपूर्ण टप्पा 1 मे पासून सुरू होणार असून 18 वर्षांपुढील सर्वजण लस घेऊ शकणार आहेत. लस घेतल्यानंतर 60 दिवस आपणास रक्तदान करता येत नाही. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लशीची मात्रा घेण्यापूर्वी रक्तदान करावे,  असे आवाहन मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

श्री.  वडेट्टीवार म्हणाले, आता रुग्णालयांमध्ये कोविड आणि नॉन-कोविड अशा दोन्ही रुग्णांवर उपचार केले जात आहेत. त्यामुळे अधिकाधिक रक्तदात्यांची आवश्‍यकता भासत आहे. त्यातच कोरोना लस घेतल्यावर 60 दिवसांपर्यंत रक्तदान करता येणार नाही. त्यामुळे आधी रक्तदान करा आणि त्यानंतर कोरोना प्रतिबंधात्मक लस घ्या. त्यासाठी 28 एप्रिल नंतर cowin.gov.in

या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करा.  कोरोनामुळे मागील वर्षापासून रक्तदानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.  रक्ताचा तुटवडा पाहून  सामाजिक भान जपून  रक्तदान करा. त्यामुळे रक्ताची मागणी असणाऱ्या रुग्णांचा जीव वाचविता येईल, असे आवाहन श्री. वडेट्टीवार यांनी केले आहे.