छत्रपती संभाजीनगरमधील दंगल नियंत्रणात! तणावानंतर शांतता; ५०० दंगेखोरांवर गुन्हा 

पोलिसांवरही हल्ला: दंगेखोरांना पकडण्यासाठी ८ ते १० पथके

१८ वाहनांची जाळपोळ ,किराडपुऱ्यातील दंगलीत १६ पोलिस जखमी

छत्रपती संभाजीनगर,३० मार्च  / प्रतिनिधी :-  छत्रपती संभाजीनगर शहराच्या नामांतराच्या महिन्याभरानंतर शहरात मोठा तणाव निर्माण झाला होता . रामनवमीच्या पार्श्वभूमी किराडपुऱ्यातील राम मंदिरात तयारीसाठी जमलेल्या युवकांच्या एका गटाचा दुसऱ्या गटाशी वाद झाला. काही क्षणातच परिसरात दंगल पेटली. अनियंत्रित झालेल्या गटाने पोलिसांवरही हल्ला केला. त्यांची वाहने दगडफेक करुन फोडली. या हल्ल्यात १६ पोलिसांसह पाच ते सहा जण जखमी झाले. बुधवारी रात्री ११.३० वाजता सुरू झालेला हा हिंसाचार पहाटे ३.३० वाजेपर्यंत सुरू होता. गुरुवारी साजरा होणाऱ्या रामनवमीनिमित्त शहरात विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहराच्या मिश्र वस्तीत असलेल्या किराडपुऱ्यातील राम मंदिरात देखील जय्यत तयारी सुरू होती. रात्री ११.३० वाजेच्या सुमारास तरुणांचा एक गट मंदिराच्या दिशेने जात होता. येथेच तणावाची पहिली ठिणगी पेटली.या दंगलीचा गुन्हा ५०० जणांविरुद्ध दाखल करण्यात आला आहे. 

दंगलीत जखमी पोलिसांना घाटीमध्ये नऊ पोलिसांना भरती करण्यात आले. यामध्ये आठ पुरुष आणि एका महिलेचा समावेश असून एमजीएम रुग्णालयात आठ पोलिसांना भरती करण्यात आले आहे.यामध्ये तीन वरिष्ठ अधिकाऱ्याचा समावेश आहे.यामध्ये एक डीवायएसपी तसेच पोलिस निरीक्षक चा समावेश आहे या पोलीस कर्मचाऱ्यांवर उपचार करून त्यांना सोडून देण्यात आले आहे.

दोन्ही गटात सुरुवातीला बाचाबाची होऊन वाद वाढला व शिवीगाळ सुरू होऊन दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी सुरू झाली. काही क्षणातच एका गटाने मंदिराच्या दिशेने दगडफेक केली. जीव वाचवण्यासाठी काही लोक मंदिरात घुसले, त्यांच्यावरही हल्ला करण्यात आला. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी वाढीव बंदोबस्त मागवला, मात्र ते येईपर्यंत जाळपोळ सुरू झाली होती. मंदिरासमोर उभे असलेले पोलिसांचे वाहन दंगेखोरांनी जाळले. जमाव नियंत्रणात आणण्यासाठी काही धर्मगुरुंना बोलावण्यात आले. पण जमाव त्यांचेही ऐकण्याच्या तयारीत नव्हता. काही वेळात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. मात्र दंगेखोरांनी त्यांच्यावरही दगडफेक करुन गाडीच्या काचा फोडल्या. पोलिसांनी लाठीचार्ज करुन जमावाला पांगवले. अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडला. नंतर अग्निशमन विभागाच्या गाड्यांमधून पाण्याचा मारा करण्यात आला.

जमाव हाताबाहेर गेल्याने पोलिसांनी हवेत गोळीबार केला. हा गोळीबार दोन तीन वेळा ऐकू आल्याचे रहिवाशांनी सांगितले. आझाद चौक ते सिटी चौकापर्यंत सर्व पोलिस रस्ता पोलिसांनी बंद केला. त्याशिवाय बहुतांश नागरिकांच्या घरावर दगडफेक झाली. तेथील लोकांना घराबाहेर येण्यासाठी नागरिक उद्युक्त करत होते. ३.३० वाजेपर्यंत जमाव नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू होते.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील घटनास्‍थळी पोहोचले. त्‍यांनी जनतेला शांतता राखण्‍याचे आवाहन केले.

 प्रक्षोभक विधाने करून परिस्थिती चिघळली पाहिजे, असा काही नेत्यांचा प्रयत्न -उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

छत्रपती संभाजीनगरमधील किऱ्हाडपुरा येथे काल रात्री २ वाजता दोन गटांमध्ये हिंसाचार झाला. यामध्ये पोलिसांच्या गाड्यांसह अनेक गाड्या पेटवण्यात आल्या. जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार आणि अश्रुधुराचा वापर करावा लागला. या सर्व प्रकरणावरून आज राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहेत. काही विरोधकांनी यामध्ये राज्य सरकारचा हात असल्याची टीका केली. या सर्व प्रकरणावर बोलताना उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “घडलेली घटना ही दुर्दैवी असून काही नेते भडकाऊ प्रतिक्रिया देत असून परिस्थिती आणखी चिघळली पाहिजे, यासाठी प्रयत्न करत आहेत.” असे म्हणत टीका केली.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “छत्रपती संभाजीनगरमधील घटना ही दुर्दैवी असून त्या ठिकाणी आता शांतता प्रस्तापित करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र काही नेते प्रक्षोभक विधाने करून परिस्थिती चिघळली पाहीजे, असा प्रयत्न सुरु आहे. अशा नेत्यांनी कसे वागले पाहिजे हे समजून घेण्याची गरज आहे. चुकीची विधाने न करता सर्वांनी शांतता पाळावी. याला राजकीय रंग देण्याचा कोणीही प्रयत्न करत असेल, तर त्यापेक्षा दुर्दैवी काहीच नाही,” असे म्हणत त्यांनी टीका केली.

दरम्यान, ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे म्हणाले की, भाजप, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड आणि एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे सगळे मित्र आहेत. महानगरपालिका, विधानसभा- लोकसभा, जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणूकासाठी हा खेळ केला जात आहे. हे भागवत कराड आणि इम्तियाज जलील या दोघांचे प्लॅनिंग आहे.” असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. तसेच, २ एप्रिलला महाविकास आघाडीचा मेळावा संभाजीनगरमध्ये होणार आहे, त्यामध्ये विघ्न आणण्यासाठी हा मिंधे सरकारचा प्रयत्न आहे,” अशी टीका यावेळी त्यांनी केली.

सर्वधर्मियांनी शांतता बाळगावी-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

एकीकडे विरोधी पक्षांच्या काही नेत्यांनी राज्य सरकरवर टीका केली असताना दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सर्वांना शांततेचे आवाहन केले आहे. “सर्वधर्मियांनी शांतता बाळगावी, राज्यात कायदा, सुव्यवस्था अबाधित राखले जाईल, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे” असे आवाहन करताना म्हटले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “छत्रपती संभाजीनगरमध्ये आता परिस्थिती नियंत्रणात आहे. आपण सर्वांनी शांतता राखून रामनवमीचा उत्सव साजरा केला पाहिजे. आपल्या राज्यात सर्वधर्मीय सर्व सण एकत्र येऊन साजरे करतात. त्यामुळे सर्वधर्मीयांना माझे आवाहन आहे की, इतके वर्षे आपण सण आनंदाने साजरे करत आलो आहोत. आत्ताही शांतता राखून उत्सव साजरे करा. राज्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावे.” दरम्यान, ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे आणि खासदार संजय राऊत यांनी यामागे राज्य सरकारचा हात असल्याची टीका केली आहे.

कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांचे आवाहन

छत्रपती संभाजीनगरमध्ये वातावरण आता शांततापूर्ण असून स्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे, अशी माहिती छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी दिली. ज्या दंगेखोरांनी रात्री किराडपुरा येथे तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्यांना पकडण्यासाठी पोलिसांचे ८ ते १० पथक तयार करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

सध्या शहरात पुरेसा ३ हजार ५०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याविषयी माहिती देताना पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी सांगितले की, दंगेखोरांवर पोलीस कारवाई करत आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या दंगेखोरांना शोधून त्यांना अटक करण्यात येईल व पुढील कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी केले.

निखील गुप्ता म्हणाले की, शहरातील सर्व लोक नेहमीच एकोप्याने राहतात. त्यामुळे आताही वातावरण चांगले ठेवण्यासाठी नागरिकांनी आम्हाला मदत करावी.